रत्नागिरी - भाजपच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी अॅड. दीपक पटवर्धन यांची एकमताने निवड करण्यात आली. तशी घोषणा खा. मनोज कोटक यांनी पत्रकार परिषदेत केली. बुधवारी झालेल्या जिल्हाध्यक्ष निवडणुकीत खा. मनोज कोटक यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी आ. प्रसाद लाड, नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष दिपक पटवर्धन, माजी आ.बाळ माने, प्रशांत शिरगावकर आदी उपस्थित होते.
यावेळी कोटक म्हणाले, जिल्ह्याची भौगोलिक स्थिती लक्षात घेता या जिल्ह्याचे दोन भाग करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. यापूर्वी जिल्ह्याला एक जिल्हाध्यक्ष होता मात्र, यापुढे दक्षिण व उत्तर असे २ जिल्हाध्यक्ष असतील. रत्नागिरी दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी अॅड. दिपक पटवर्धन यांनी पुन्हा एकदा निवड केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
उत्तर रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्षाची निवड येत्या ८ दिवसात होणार असून ही निवडप्रक्रिया एकमताने झाल्याचे ते म्हणाले. दरम्यान देशभरातील हिताचे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना आता भाजपची भीती वाटू लागलीय, या भीतीपोटीच महाराष्ट्रात 'महाबिघाडीचे' सरकार अस्तित्वात आल्याची टीका खा. कोटक यांनी केली.
हेही वाचा - VIDEO : कारच्या धडकेत वृद्ध महिला ठार, रत्नागिरी जिल्ह्यातील घटना
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले की, ही निवड एकमुखाने झाली आहे. रत्नागिरीत भाजपची ताकत आणि जनाधार वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असून पक्षाचे अस्तित्व अधोरेखीत व्हावे, एक भक्कम चित्र निर्माण करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढील वाटचाल करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - रत्नागिरीत दुसर्या शाश्वत पर्यटन परिषदेत पर्यटन वाढीसाठी विचारविनिमय