रत्नागिरी - आर्यन खान प्रकरणात एनसीबीने केलेली कारवाई योग्य आहे, पण त्यातील साक्षीदार आणि कारवाईबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तर एनसीबीला द्यावी लागतील असे गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील यांनी म्हटले आहे. आज (गुरूवार) रत्नागिरी दौऱ्यावर असलेल्या सतेज पाटील यांनी जिल्ह्याधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाजपाला समाधान होईल असे आम्ही काहीही करणार नाही. सरकार म्हणून आम्ही एकत्र असून पुढील 15 वर्षे हे सरकार टिकेल असे देखील रत्नागिरी येथील पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले. आमच्यामध्ये मतभेद किंवा मनभेद काहीही नाहीत असेही पाटील यावेळी म्हणाले.
फडणवीस यांना वास्तवतेची जाणीव अजून झालेली नाही -
देवेंद्र फडणवीस यांना वास्तवतेची जाणीव अजून झालेली नसून ती होणे गरजेचे आहे असा टोला सतेज पाटील यांनी लगावला आहे. सरकार स्थापन होऊन दोन वर्षे झाली. देवेंद्र फडणवीस यांनी मला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते असे विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले. तसेच ज्या ठिकाणी आघाडी शक्य आहे. त्या ठिकाणी आघाडी होईल. स्थानिक पातळीवर हा निर्णय होईल. शक्य असेल त्या ठिकाणी एकत्र लढू आणि शक्य नाही त्या जागेवर विरोधात लढून एकत्र येऊ असे देखील सतेज पाटील यांनी म्हटले आहे. भविष्यात महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार का? या प्रश्नांला त्यांनी हे उत्तर दिले.
सरकारला बदनाम करण्याचे काम किरीट सोमैया करत आहेत -
सरकार पडणार नाही हे कळल्यामुळे आता सरकारला बदनाम करण्याचे काम किरीट सोमैया करत असल्याचे सतेज पाटील यांनी रत्नागिरी येथील पत्रकार परिषदेत म्हटले आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणाला कायदेशीर उत्तर दिले जाईल असे देखील पाटील म्हणाले.
हेही वाचा - राज्य सरकारने केलेल्या कामावर टीका करण्याचा भाजप नेत्यांना जॉब - नाना पटोले