रत्नागिरी - दापोली तालुक्यात एका 26 वर्षीय विवाहितेने मंगळवारी (दि. 27 ऑक्टोबर) रात्री आपल्या दोन लहान मुलांसह गावातील जंगलात असलेल्या विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोवेली गावातील चव्हाण वाडीतील ही महिला आहे. यामुळे सोवेली गावावर शोककळा पसरली आहे.
सोवेली चव्हाणवाडी येथील प्रथमेश लाड हे नोकरीनिमीत्त विरार येथे आपल्या कुटुंबासह रहात होते. मात्र, टाळेबंदीनंतर ते 16 मार्चला पत्नी सिद्धी (वय 26 वर्षे), मुलगा प्रणीत (वय 3 वर्षे), व स्मित (वय 1 वर्षे 3 महिने) यांना घेऊन सोवेली येथील घरी राहायला आले होते. मंगळवारी (दि. 28 ऑक्टोबर) रात्री 8.15 वाजता सिद्धीने जेवण तयार केले. त्यावेळी तिचे मामा सुभाष चव्हाण हेही घरी आले होते. त्यांनी सर्वांशी गप्पा मारल्या. त्यानंतर ते घरी गेले. तर प्रथमेश देवाच्या खोलीत नामस्मरण करत बसले होते. प्रथमेषचे वडील घराबाहेर मासे साफ करत होते. मासे साफ केल्यावर वडिलांनी घरात येऊन सिद्धी व लहान मुले कोठे गेली अशी प्रथमेशकडे विचारणा केली. मात्र, हे तिघेही घरात कोठेच दिसले नाहीत. त्यामुळे या तिघांचाही सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली. वाडीतील लोकांनीही या तिघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना मध्यरात्रीनंतर गावातीलच वाकण या जंगल परिसरात असलेल्या सार्वजनिक नळपाणी पुरवठा करणार्या विहिरीत सिद्धी, प्रणीत व स्मित यांचे मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे आढळून आले. त्यानंतर ही माहिती दापोली पोलिसांना कळविण्यात आली.
दापोली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करुन आज (दि. 28 ऑक्टोबर) सकाळी मृतदेह विहिरीबाहेर काढले व शवविच्छेदनासाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा - राज्याच्या सागरी हद्दीत परप्रांतीय मच्छिमारांची घुसखोरी, स्थानिक मच्छिमार आक्रमक