रत्नागिरी - काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात महापुराने अक्षरशः हाहाकार माजवला होता. या महापुरात जवळपास 900 ते 1 हजार कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी एन. पाटील यांनी दिली.
चिपळूणात ९ हजार २७३ कुटुंबांचे मोठे नुकसान -
याबाबत बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'महसूल विभागाकडून महापुराने बाधित झालेल्यांचे 100 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. यात चिपळूणमध्ये सर्वाधिक नुकसान आहे. येथील ९ हजार २७३ कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. तर ४ हजार ३५९ दुकानांचे नुकसान झाले आहे. सोबतच जवळपास ५ हजार गाड्यांचे नुकसान झाल्याचा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. दरम्यान, महापुरामुळे जिल्ह्यातील १० हजार ५७३ कुटुंबांचे नुकसान झाले असून सानुग्रह अनुदानासाठी एवढी कुटुंब पात्र असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच या महापुरात चिपळूणमध्ये ४० घरे पूर्णतः पडली आहेत. तर ११९८ घरे अंशतः बाधित झाली आहेत. जिल्ह्यात एकूण २८१४ घरांचे अंशतः नुकसान झाले असून १०६ घरे पूर्णतः बाधित झाली आहेत.
40 जणांचा मृत्यू -
चिपळूण आणि खेडमध्ये या नुकसानीचा आकडा जास्त आहे. तर भुस्खलन आणि पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील ४० जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूंमध्ये खेड आणि चिपळूणमधील ३२ व्यक्तींचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी दिली आहे.