रत्नागिरी - खेड नगर पालिकेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना अपात्र करावं, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिवसेनेकडून आणखी चार प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर यावर निर्णय घेऊन नगराध्यक्ष वैभव खेडकर यांना अपात्र करावं, अशी मागणी करण्यात आली, असे खेड-दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
खेडमधील राजकीय वातावरण तापलं-खेड नागरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. सध्या खेड नगरपालिकेत नगराध्यक्ष मनसेचे वैभव खेडेकर आहेत. मात्र वैभव खेडेकर यांनी गेल्या चार वर्षांत नगर पालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून अनेक नियमबाह्य कामे केली असल्याचा आरोप शिवसेनेकडून होत आहे. त्यातच शिवसेना नेते माजी मंत्री रामदास कदम यांनी यामध्ये लक्ष घातल्यामुळे खेडमधील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या विरोधात आणखी 4 प्रस्ताव-दरम्यान, नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याविरोधात तब्बल 11 अपात्रतेचे प्रस्ताव यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिवसेनेचे नगर परिषदेतील गटनेते व नगरसेवकांकडून दाखल करण्यात आले आहेत. आज यात आणखी चार प्रस्तावांंची भर पडली आहे. सर्वसाधारण सभेचा ठराव परस्पर बदलणे, नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये मनसेचे पक्ष प्रवेश घेवून राजशिष्ठाचाराचा भंग, नगरोत्थान योजनेतून शहरातील संरक्षित भिंत बांधताना सागाच्या झाडाची तोड, याबाबत तक्रारी येवून सुद्धा चौकशी समिती नेमली नाही, असा शिवसेनेचा आरोप आहे. अशा आरोपांचे 4 प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे मनसे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याविरोधात आता एकूण 15 अपात्रतेचे प्रस्ताव दाखल झाले आहेत.मनसे नगराध्यक्षांची कोंडी-
शिवसेनेच्या नऊ नगरसेवकांची सही असलेले अपात्रतेचे प्रस्ताव नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याविरोधात सादर करण्यात आले, अशी माहिती शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. नगराध्यक्षांच्या दालनात झालेले मनसेचे पक्ष प्रवेशाचा फोटोचा पुरावा दाखवत शिवसेनेने मनसे नगराध्यक्षांची चांगलीच कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा- फेरीवाल्यांकडून जमा केली जातेय खंडणी, मनसेचा सेनेवर गंभीर आरोप