रत्नागिरी - खेडमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आणखीन २३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे रत्नागिरीकरांसाठी ही एक दिलासादायक बाब आहे. दुबईतून आलेल्या ५० वर्षीय व्यक्तीचा ८ एप्रिल रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर आरोग्य प्रशासन हादरले होते.
मृत व्यक्ती राहात असलेला अलसुरे येथील भाग सील करण्यात आला होता. तर या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा अहवाल मिरज इथे तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. याआधी या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. तर आज या प्रकरणातील आणखी २३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एकूण ५१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेत.
मृत कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेत पण अहवाल निगेटिव्ह आला आहे अशांना २८ दिवासांसाठी क्वारंटाईन केले जाणार आहे. प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान संगमेश्वर येथील नऊ जणांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत.