रायगड - म्हसळा तालुक्यातील पाभरा गावात, अशी एक घटना घडली असून यात एका युवकाला जीव गमवावा लागला आहे. बदर अब्दुल्ला हळदे (23) असे जानसई नदीत बुडालेल्या युवकाचे नाव आहे. अद्याप या युवकाचा शोध लागलेला नाही. नद्यांना पूर आलेला असल्याने कोणीही नदीत पोहण्यास जाऊ नका, अशा सूचना रायगड जिल्हा प्रशासनाकडून केल्या जात आहे. तरीही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यातून अनेकदा दुर्घटना होत असून काहींना आपला जीव गमावावा लागत आहे.
हेही वाचा - आधी मटणावर ताव मग श्रीरामाचा जयघोष..! धुळ्यातील भाजपा कार्यकर्त्यांचा प्रताप
म्हसळा तालुक्यातील पाभरा गावातून जानसई नदी वाहते. जिल्ह्यात मुसळधार पावसाने जिल्ह्यातील नद्यांनी आपली धोका पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. जानसई नदीची धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. असे असताना पाभरा गावातील चार पाच युवकांनी नदीवरील पुलावरून वाहत्या नदीत उड्या मारल्या. या युवकांमध्ये बदर यानेही आपला जीव धोक्यात घालून उडी मारली. इतर युवक हे पोहून किनाऱ्यावर आले. मात्र, बदर हळदे याला वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने नदीच्या प्रवाहात वाहून गेला.
बदर हा वाहून जातानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून ही घटना घडल्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. मात्र, अद्याप बदरचा शोध लागलेला नाही. पुराच्या पाण्यात जाऊ नका, अशा सूचना असतानाही बदर यांनी याकडे दुर्लक्ष करून प्राणाला आमंत्रण दिले आहे.