रायगड - जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीला शुक्रवारी पूर्णविराम मिळाला. अनुसूचित जमाती महिला यासाठी राखीव असणाऱ्या अध्यक्षपदी शेकापच्या पनवेल तालुक्यातील वावंजे गटातून निवडून आलेल्या योगिता पारधी यांची निवड झाली. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत तालुक्यातील बीड गटातून निवडून आलेले सुधाकर घारे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. भरत शितोळे यांनी हा निकाल जाहीर केला.
हेही वाचा... चुनावी जुमला.. मोदी आणि शाहांविरोधात दाखल झाला खटला!
रायगड जिल्हा परिषदेच्या प्रभाकर पाटील सभागृहात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूक पार पडली. यावेळी प्रांताधिकारी शारदा पोवार, उपमुख्यकार्यकरी अधिकारी प्रकाश खोपकर, सर्व सदस्य, पंचायत समिती सभापती उपस्थित होते. राज्यात महाविकास आघाडी झाल्यानंतर रायगड जिल्हा परिषदेत सत्तांतर होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र तसा कोणताही अपेक्षीत चमत्कार पहायला मिळाला नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप आघाडी कायम राहिली आहे.
हेही वाचा... 'हिंदुत्ववाद केवळ दिखावा... भगवी शिवसेना आता काँग्रेसच्या रंगात रंगलीय'
2017 साली झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची निवडणुकीपूर्वी आघाडी होऊन सत्ता काबीज केली होती. शेकापचे निवडणुकीत 23 सदस्य निवडून येऊनही आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्ष पद दिले. अदिती तटकरे ह्या अध्यक्ष तर शेकापचे अॅड. आस्वाद पाटील हे उपाध्यक्ष झाले होते. अडीच वर्षे कार्यकाल संपल्यानंतर अध्यक्ष पद हे शेकापकडे आले. त्यानुसार आज झालेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत योगिता पारधी यांची अध्यक्षपदी तर सुधाकर घारे यांची उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली.
हेही वाचा... प्रणिती शिंदेंना मंत्रीपद देण्यास मल्लिकार्जुन खरगेंचा अडसर, शिंदेंचे कार्यकर्ते आक्रमक
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस अशी महाआघाडीची समीकरणे जुळून येऊन सत्ता आली आहे. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेत यावेळी सत्तेची गणिते फिरली जातील, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र असा कोणताही चमत्कार घडला नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप आघाडीचीच सत्ता पुन्हा जिल्हा परिषदेवर आली आहे.
हेही वाचा... गोडसे, सावरकर समलैंगिकतेचा वाद पेटला; राहुल गांधींना समलैंगिक म्हणत हिंदू महासभेचा पलटवार
शेकापकडून अध्यक्ष पदासाठी योगिता पारधी तर उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांनी आपले अर्ज निवडणूक अधिकारी भरत शितोळे यांच्याकडे दाखल केले. शिवसेनेने आपले उमेदवार दिले नाही. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी भरत शितोळे यांनी योगिता पारधी आणि सुधाकर घारे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. योगिता पारधी आणि सुधाकर घारे यांची अध्यक्ष, उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्याचे सर्वांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मात्र यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीला उत्साह नसल्याचे वातावरण जिल्हा परिषदेत पसरलेले दिसत होते. निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता.