रायगड - आज जागतिक महिला दिवस जगभरात साजरा केला जात आहे. पुरुषप्रधान संस्कृतीला फाटा देत मागील काही वर्षांत प्रत्येक क्षेत्रात महिलांचा पुढाकार वाढला आहे. महिलांही आता सर्वच क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुढे येत आहेत. नोकरी, व्यवसायामध्ये महिला पुरुषाबरोबर उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. रायगड जिल्ह्यातल्या मुख्य शासकीय कार्यालयातही सध्या महिलाराज आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक आणि रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ही जिल्ह्याची पदे सोडल्यास जिल्हाधिकारी, जिल्हा न्यायाधीश, जिल्हा वाहतूक नियंत्रक, उत्पादन शुल्क, आरटीओ, निवडणूक अधिकारी, जिल्हा भूमी अभिलेख, उपजिल्हाधिकारी तसेच 4 प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी या पदावर महिला कार्यरत आहेत. तर राजकीय क्षेत्रात पालकमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष यासुद्धा महिलाच आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा कारभार हा खऱ्या अर्थाने महिलांच्याच हातात आहे.
हेही वाचा - "पनवेल महानगरपालिका क्षेत्रात चार कोरोना रुग्ण आढळल्याची अफवा"
चूल आणि मूल ही संकल्पना आता मागे पडली आहे. महिलाही आता आपल्या पायावर उभ्या राहण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक क्षेत्र हे आता महिलांनी व्यापलेले आहेत. महिलेच्या हातात घराच्या चाव्या असल्या की, घराला घरपण प्राप्त होत असते. कामात असलेली एकनिष्ठा त्यामुळे महिला या उच्चपदावर आपले काम प्रामाणिकपणे करत असतात. दिलेली जबाबदारी पूर्ण करतात. त्यामुळे हल्ली पुरुषांपेक्षा महिलांचा नोकरी, व्यवसायमध्ये दबदबा वाढू लागला आहे.
रायगड जिल्हा हा खऱ्या अर्थाने महिलांच्या हातात असून जिल्ह्याची जबाबदारी चोख बजावत आहेत. जिल्ह्यातील मुख्य शासकीय कार्यालयाच्या प्रमुख या महिला अधिकारी आहेत. जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा न्यायाधीश विभा इंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली माने, जिल्हा वाहतूक नियंत्रक अनघा बारटक्के, जिल्हा आरटीओ उर्मिला पवार, जिल्हा अधीक्षक चारुलता चव्हाण, या जिल्ह्याची जबाबदारी पार पाडत आहेत.
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद अदिती तटकरे भूषवित असून जिल्हा परिषद अध्यक्ष हे योगिता पारधी यांच्याकडे आहे. तर अलिबाग पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून सोनाली कदम काम पाहत आहेत. जिल्ह्यातील वैशाली परदेशी (कर्जत), प्रतिमा पुदलवाड (पेण), प्रशाली दिघावकर (माणगाव) तर शारदा पोवार (अलिबाग) या महिला प्रांताधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. दीप्ती देसाई (पोलादपूर), प्रियंका कांबळे (माणगाव), कविता जाधव (रोहा) तर अरुणा जाधव (पेण) या महिला तहसीलदार म्हणून काम करत आहेत.
हेही वाचा - रायगडची 'ती' हिरकणी ठरली कोकण रेल्वेची पहिली महिला रेल्वे चालक..!
जिल्ह्यातील न्यायालय, महसूल, आरटीओ, भूमी अभिलेख, वाहतूक सेवा, उत्पादन शुल्क, निवडणूक शाखा या विभागाची महत्वाची जबाबदारी या महिला अधिकारी लीलया पद्धतीने सांभाळत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने रायगड जिल्हाचे भवितव्य घडविण्याचे काम या महिला अधिकारी करीत आहेत.