खालापूर (रायगड) - खालापूर तालुक्यातील रानसई हद्दीतील झाडीत एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही बातमी कळताच वावोशी दूरक्षेत्र आणि खालापूर पोलीस घटनास्थळी रवाना झाले आणि सदर घटनेची सखोल चौकशी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
हा मृतदेह ३५ ते ४० वर्षीय महिलेचा असून हा प्रकार ७ ते ८ दिवसांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. सदरील मृतदेह सडला असून या महिलेचे शिर धडावेगळे झाल्याचे दिसून आले आहे. परंतु मृतदेह सडला असल्याकारणाने डोक्याची फक्त कवटीच दिसून आली. डोक्याचे केस बाजूला पडलेले होते. केस काळेभोर असून तिच्या नखाला लाल रंगाची नख पॉलिश दिसत असल्यामुळे ती ३५ ते ४० वर्षाची तरुण महिला असल्याचे समजते. तसेच तिच्या पायात पैंजण आणि गळ्यात मंगळसूत्र असल्यामुळे ती महिला विवाहित असल्याचे समजते.
घटनास्थळी भेट - याची माहिती मिळताच खालापूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनेची सखोल चौकशी पोलीस उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश कराड, सुर्वे, पोलीस हवालदार निलेश सोनवणे, नितीन शेडगे, हेमंत कोकाटे करीत आहेत.
हेही वाचा - Raigad Crime : महाडमध्ये मुलांसह महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; सहा चिमुकल्यांचा मृत्यू