रायगड - कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे आणि कोरोनाची साखळी तुटावी, यासाठी शासनाने मिनी लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत लागू केले. एप्रिल महिन्यातील शुक्रवारी रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले. तर सोमवार ते शुक्रवारपर्यंत अत्यावश्यक सेवेची दुकाने सोडता इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत. मात्र यामध्ये वाइन शॉप्सही बंद राहणार असल्याबाबत कोणतीही पूर्वसूचना तळीरामाना नसल्याने त्याचे घसे आता 30 एप्रिलपर्यंत खुले राहणार आहेत. मात्र बार सुरू असून पार्सल सुविधा मिळणार असल्याने काही प्रमाणात तळीराम यांना रोजच्या घोटाची तहान जास्तीचे पैसे देऊन भागवावी लागणार आहे. त्यामुळे हा मिनी लॉकडाऊन तळीरामाच्या खिशाला चाट देणारा ठरणार आहे.
वाइन शॉप्स, देशी दारूची दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद
शासनाने 30 एप्रिलपर्यंत मिनी लॉकडाऊनची घोषणा केली. शासनाने शनिवार, रविवार दोन दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे पुढील पाच दिवस सर्व व्यवहार सुरळीत सुरू राहणार, अशी अनेकांची धारणा होती. मुख्यत्वे तळीरामांना असे वाटत होते. त्यामुळे शनिवार, रविवार दोन दिवस साठा करण्याची मनोकामना तळीरामांनी मनात मांडली होती. मात्र 30 एप्रिलपर्यंत अत्यावश्यक दुकाने सोडून इतर दुकानांसोबत वाइन शॉप्सही बंद राहणार असल्याने तळीरामांसमोर यक्षप्रश्न उभा राहिला आहे. अचानक आज 6 एप्रिलपासून सुरू झालेला हा लॉकडाऊन तळीरामासाठी घसा कोरडा ठेवणारा ठरला आहे.
तळीरामांच्या खिशाला बसणार आर्थिक चाट
वाइन शॉप्स बंद झाल्याने तळीरामचे हाल झाले आहेत. पण शासनाने बार सुरू ठेवले असून पार्सल सुविधा दिली आहे. ही एक तळीराम याच्यासाठी आनंदाची बाब आहे. मात्र वाइन शॉप्सपेक्षा बारमध्ये मद्यासाठी जास्तीचे पैसे तळीरामांना मोजावे लागणार आहेत. त्यामुळे तळीरामाच्या खिशाला हा मिनी लॉकडाऊन आर्थिक दृष्ट्या खर्चिक ठरणार आहे, हे नक्की. बार सुरू मग वाइन शॉप्सला परवानगी का नाही, मद्यपींना या लॉकडाऊनचा आर्थिक झटका बसणार असताना वाइन शॉप्स व्यवसायिकांनाही तो बसणार आहे. याबाबत वाइन शॉप्स व्यवसायिकांनी जिल्हा प्रशासनाकडे याबाबत धाव घेतली होती. मात्र शासन निर्णय असल्याने वाइन शॉप्स बंदच राहणार आहेत. बार सुरू ठेवून त्यांना विक्रीस परवानगी आहे, मग आम्हालाही द्या अशी मागणी वाइन शॉप्स व्यवसायिकांनी शासनाकडे केली आहे. त्यामुळे मद्यपींसह वाइन शॉप्स व्यवसायिकांनाही आर्थिक फटका बसणार आहे.