रायगड - मागील नऊ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे रुंदीकरण पूर्ण होण्याला अखेर मुहूर्त सापडला. जून 2020 पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होणार आहे. या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी ही दिलासादायक गोष्ट आहे.
पळस्पे ते इंदापूर दरम्यान 84 किमी लांबीच्या महामार्गाचे रुंदीकरणाला डिसेंबर 2011 मध्ये सुरुवात करण्यात आली होती. साठ मीटर रुंदीच्या या रस्त्यासाठी 942 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. मात्र, रुंदीकरणासाठी झालेला विलंबामुळे हा खर्च 540 कोटींनी वाढला असून तो 1 हजार 482 कोटीपर्यंत गेला आहे. आत्तापर्यंत महामार्गाचे पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे. राहिलेले काम जून 2020 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - केंद्रीय पथकाची ७ मिनिटांची अजब पाहणी; ९० टक्के नुकसानग्रस्त सोयाबीनकडे दुर्लक्षच
मुंबई-गोवा महामार्ग दुरूस्ती दरम्यान रस्त्यावर पाणी निचऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी रस्त्याच्या मध्यभागी आणि दोन्ही बाजूला गटारे बांधण्यात आली आहेत. महामार्गालगतच्या गावांसाठी सर्व्हिस रोडची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. मात्र, दुचाकी स्वारांसाठी कोणतीच स्वतंत्र व्यवस्था नसल्याने त्यांचा प्रवास राम भरोसेच राहणार आहे.
हेही वाचा - पवारांनी सुरुवात केली पवारच शेवट करतील - आमदार बच्चू कडू
नियोजित 84 किलोमीटर अंतरात अंबा नदी, खारपाडा येथील पाताळगंगा नदी, कुंडलिका नदी, पेण-रामवाडी आणि वडखळ येथे पाच मोठे उड्डाणपूल असणार आहेत. पेण तालुक्यातील गडब गावानजीक देखील उड्डाणपूल होणार असल्याची माहिती या प्रकल्पाचे प्रकल्प संचालक प्रशांत फेगडे यांनी दिली.
2020 मध्ये महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर सुप्रीम पनवेल-इंदापूर टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे टोल आकारणी केली जाणार आहे. या टोल आकारणीसाठी पेण तालुक्यातील खारपाडा आणि वाकण येथे टोल आकारणी केंद्रांची निर्मिती करण्यात येणार आहे. 2011 ते 2032 या एकवीस वर्षांच्या कालावधी दरम्यान कंपनी टोल आकारणी करणार आहे. महामार्गाच्या रुंदीकरणचा वाढलेला खर्च पाहता टोल आकारणीच्या कालावधीत आणखी तीन वर्षे वाढ होण्याची शक्यता आहे.
पेण तालुक्यातील वाशी नाका, डोलवी गावाजवळ उड्डाणपूलाची आवश्यकता आहे. मात्र, येथे उड्डाणपूल केले नसल्याने मोठे आंदोलन उभारण्यात आले होते. जनतेने उभारलेल्या लढ्यामुळे या दोन्ही ठिकाणी उड्डाणपुलाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.