रायगड - जिल्ह्यात 45 वर्षापुढील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण लस नसल्यामुळे बंद आहे. पण 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण जिल्ह्यात सध्या जोरदार सुरू आहे. जिल्ह्यात पाच ठिकाणी हे लसीकरण सुरू आहे. प्रत्येक केंद्रावर 200 जणांना ऑनलाइन नोंदणी केलेल्या 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस दिली जात आहे. कोरोनाच्या नियमाचे पालन करून लसीकरण सुरू आहे. मात्र 45 वर्षावरील नागरिक लसीच्या प्रतीक्षेत राहिले आहेत.
जिल्ह्यात 5 केंद्रांवर लसीकरण
18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहेत. जिल्ह्यात 10 हजार लसीचा साठा प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात पनवेल महानगर पालिका क्षेत्रात 3, अलिबाग आणि पेण येथे प्रत्येकी 1 असे 5 केंद्रांवर लसीकरण होत आहे. 1 मे पासून लस पुरवठा प्राप्त झाल्यानंतर हे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत 3 दिवसात साधारण 2 हजार नागरिकांचे लसीकरण झालेले आहे.
45 वर्ष वयोगटातील नागरिक लसीपासून वंचित
जिल्ह्यात 45 वर्ष वयोगटातील अडीच लाख नागरिकांना आतापर्यंत लस देण्यात आली आहे. मात्र, गेल्या 6 दिवसांपासून 45 वर्ष वयोगटातील नागरिकांचा लस साठा आलेला नाही. त्यामुळे अनेक नागरिक लसीपासून वंचीत राहिले आहेत. त्यातच दुसरा डोस घेणारे नागरिकही लसीपासून वंचीत राहिले आहेत. त्यामुळे जोपर्यंत 45 वर्षांवरील नागरिकांची लस येत नाही, तोपर्यंत त्यांचे लसीकरण बंद ठेवण्यात आलेले आहे. लस आल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू केले जाईल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र लस कधी येणार याबाबत कोणाकडेही उत्तर नाही.
'आम्ही लस घेतली, तुम्हीही घ्या'
18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. तरुणांना सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे या वयोगटातील नागरिकांनी लस घेणे गरजेचे आहे. वकिल पल्लवी तुळपुळे, केदार पाटकर यांनी लस घेतली. 'आम्ही लस घेतली आहे. तुम्हीही घ्या, घरी रहा, सुरक्षित रहा', असे आवाहनही त्यांनी केले आहे.
लसीकरणासाठी नोंदणी कशी कराल?
नोंदणीसाठी https://www.cowin.gov.in/home या वेबसाईटवर जा. यावर नोंदणी केल्यानंतर लसीकरण केंद्र, तारीख, वेळ इत्यादी माहिती तुम्हाला आधीच कळवली जाईल. वेबसाईट उघडल्यानंतर उजव्या कोपऱ्यातील Register / Sign in yourself या पिवळ्या रंगाच्या बटणावर क्लिक करा. या वेबसाईटवर Register for Vaccination ची विंडो दिसेल. त्यानंतर Register पर्यायावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाइल नंबर विचारला जाईल. त्यावर OTP येईल. तो OTP टाकल्यानंतर नवीन विंडो उघडेल. येथे फोटो आयडी प्रूफ, फोटो आयडी नंबर, नाव, जन्मतारीख, लिंग आणि सहव्याधी इत्यादी माहिती येथे तुम्हाला द्यावी लागेल.
अॅपवरूनही करू शकता नोंदणी
आरोग्य सेतू आणि कोविन अॅपवरूनही तुम्हाला लसीकरणासाठी नोंदणी करता येईल. एका मोबाइल नंबरवर तुम्हाला तीन जणांसाठी लसीकरणाची नोंद करता येऊ शकते. त्यासाठी Add या पर्यायावर क्लिक करून पुढील नावं आणि त्यांची माहिती समाविष्ट करता येईल. एखादं नाव डिलिट करण्याचाही पर्याय देण्यात आला आहे.
हेही वाचा - 'बेळगाव आणि बंगालच्या निवडणुकीवर बोलण्याची शिवसेनेची औकात नाही'
हेही वाचा - फोन टॅपिंग प्रकरण : अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी रश्मी शुक्लांची उच्च न्यायालयात धाव