रायगड - जिल्ह्यातील प्रत्येक घरात शुद्ध आणि स्वच्छ पाणी देण्याबाबत जिल्हा परिषदेने जलजीवन योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील उरण हा 100 टक्के नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरवठा करणारा राज्यातील प्रथम तालुका ठरला आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात उरण तालुक्यात नळ कनेक्शन जोडणीच्या उद्दिष्टांच्या 238.10 टक्के काम करण्यात आले आहे. तर लवकरच इतर तालुकेही हे उद्दिष्ट पूर्ण करतील असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांनी म्हटले आहे. जिल्ह्यात आतापर्यत 68.79 टक्के कुटूंबाकडे नळ जोडणी झाली आहे.
जलजीवन मिशन जिल्ह्यात जोरात सुरू
केंद्र सरकारने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. या अंतर्गत 2024 पर्यंत प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. या योजनेच्या माध्यमातून सुरुवातीला ज्या घरांमध्ये नळ कनेक्शन आहे, त्या घरांची माहिती संकलित करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ज्या घरांमध्ये वैयक्तिक नळ कनेक्शन नाही अशा घरांना नळ कनेक्शन देण्यात येत आहे. योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात उल्लेखनीय काम करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचे योग्य नियोजन
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.पी. वेंगुर्लेकर, उरण पंचायत समिती गट विकास अधिकारी निलम गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचारी यांनी योग्य नियोजन केल्याने उरण तालुका राज्यात 100 टक्के घरांना नळ कनेक्शन देणारा पहिला तालुका ठरला आहे.
नळ कनेक्शनसाठी सीओचे आवाहन
जलजीवन मिशन अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात घराघरात नळ कनेक्शन देण्यात येणार असून, उरण तालुक्यातील सर्व घरांमध्ये नळ कनेक्शन देण्यात आले आहे. या तालुक्यात जर कुणी नव्याने घर बांधले असेल किंवा एखादे कुटुंब कामानिमित्त तालुक्यात नव्याने स्थलांतरित असेल तर अशा कुटुंबांनी प्रशासनासोबत संपर्क साधून नळ कनेक्शन मागणी करावी, तसेच उरण व्यतिरिक्त जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यात ज्या कुटुंबाला वैयक्तिक नळ कनेक्शन नाही त्या कुटुंबांना नळ कनेक्शन देण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.
उरण तालुका नळ कनेक्शन दृष्टिक्षेप -
एकूण कुटुंबे - 36108
एप्रिल 2020 पूर्वी नळ कनेक्शन असलेली कुटुंबे - 26962
2020-21 मधील उद्दिष्ट - 3841
2020-21 मध्ये नव्याने जोडलेले नळ कनेक्शन - 9146
एकूण टक्केवारी - 238.10
जिल्ह्यात तालुक्यानुसार कुटुंबाकडे असलेली नळ जोडणी टक्केवारी
उरण - 100
म्हसळा - 88.40
खालापूर - 78.27
पनवेल - 78.77
कर्जत - 60.05
माणगाव - 74.57
रोहा - 68.37
महाड - 69.55
पोलादपूर - 65.86
मुरुड - 56.17
अलिबाग - 56.92
श्रीवर्धन - 86.85
तळा - 63.03
सुधागड - 49.62
पेण - 44.87