रायगड - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिल्लीतून तत्काळ बोलावणे आले आहे. त्यामुळे ते आज दुपारी 12 वाजता गोव्याहून दिल्लीकडे रवाना होणार आहेत. दरम्यान नारायण राणे आज पोलिसांपुढे हजर राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य झाल्यानंतर अटक आणि जामिनावर सुटका झाल्यानंतर नारायण राणे यांनी महाडच्या गुन्हे शाखेमध्ये भेट देणे अपेक्षित होते. पण मात्र नारायण राणे यांचे मेडिकल सर्टिफिकेट महाडच्या गुन्हे शाखेमध्ये पाठवले जाणार होते. नारायण राणे त्या ठिकाणी हजेरीला उपस्थित राहणार नसल्याचे समोर आले आहे.
राणे यांनी मी मुख्यमंत्र्यांना कानाखाली वाजवली असती, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रत्नागिरीतील संगमेश्वरमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर महाडच्या न्यायलायत राणे यांना 15 हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला होता. तसेच न्यायालयाने त्यांना 30 ऑगस्ट आणि 13 सप्टेबरला रायगड पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत महाड पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले होते.
राणेंची प्रकृती ठीक नसल्याने ते अनुपस्थित-
राणेंचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी या बाबत माहिती देताना म्हटले आहे की, राणेंना न्यायालयाने जामीन देताना काही अटी घातल्या होत्या त्यानुसार आज राणेंना दुपारी 11 ते 12 वाजताच्या दरम्यान महाड गुन्हे शाखे समोर हजर राहणे अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास राणेंची प्रकृती बिघडल्याने त्यांना महाडला येणे शक्य नव्हते. त्यासंदर्भातील मेडीकल प्रमाणपत्र आम्ही पोलिसांना सादर करण्यासाठी आलो आहोत. त्यामुळे ते आज पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष उपस्थित राहिले नाहीत.