रायगड - ४८ तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार रायगड जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. आज समुद्राला मोठी भरती असल्याने पाच मीटरपर्यंत उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज होता. सध्या किनारी भागात दोन मिटर उंचीच्या लाटांचा उसळत असून किनाऱ्याला येऊन धडकत आहेत. तुरळक नागरिकांनी किनाऱ्यावर जात या उसळणाऱ्या लाटांचा आनंद घेतला.
आज दिवसभर पावसाची संततधार सुरू आहे. समुद्राला मोठी भरती असल्याने समुद्रात लाटांचा खेळ सुरू असून समुद्रही काही प्रमाणात खवळलेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांना समुद्र किनारी जाऊन या लाटांचा आनंद घेता आला नाही. किनारी भागातील काही नागरिकांनी समुद्र किनारी जात लाटांचा आनंद घेतला.
समुद्रात लाटा उसळणार असल्याने किनारी भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला होता. समुद्रकिनारी कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी जीवरक्षक ही तैनात करण्यात आले होते. अतिवृष्टीची शक्यता असल्याने नागरिकांनी समुद्र किनारी जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात 4 ते 6 तारखेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानुसार जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे. नदी आणि समुद्रकिनाऱ्यावरील गावांना सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.