पनवेल - खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलचे विद्यार्थी असलेल्या दोन जुळ्या बहीण-भावाने यंदाच्या सीबीएससी दहावीच्या परीक्षेत यश मिळवले आहे. सृष्टी रैना आणि सबब रैना या दोघांनीही नव्वदीपार टक्के मिळवत पालकांना सुखद धक्का दिला आहे. सकाळच्या शाळेनंतर रात्री उशिरापर्यंत उजळणी, अशा सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर या दोघांनीही हे यश संपादन केले आहे.
मुंबईल्या भारत पेट्रोलियममध्ये काम करणारे संजीव रैना (रा. खारघर सेक्टर ३८) यांची ही दोन जुळी मुले. आपल्या मुलांनी मोठे झाल्यावर, असे काम करावे, की ज्यामुळे आपले नाव व्हावे, असे वडिलांचे स्वप्न होते. त्यांचे हे स्वप्न या भाऊ-बहिणींनी सत्यात उतरवले आहे. रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलमध्ये शिकणारी सृष्टी रैना हिने ९७.८० टक्के तर सबब रैनाने ९५.८० टक्के गुण मिळवत दुप्पट आनंद साजरा केला आहे.
भविष्यात अभियंता होण्याचे स्वप्न त्यांनी आपल्या डोळ्यात साठून ठेवले आहे. या दोघांनी अक्षरशः दिवस-रात्र एक करत सीबीएससी दहावीच्या परीक्षेचा अभ्यास केला. रैना दाम्पत्यांनी या दोघांमध्ये मुलगा आणि मुलगी असा भेद कधीही केला नाही.
आम्ही दोघेही एकत्र अभ्यास करायचो. एकमेकांच्या शंका चर्चा करून दूर करायचो. यामुळे दहावीत हे यश मिळवता आले, असे सृष्टी आणि सबब यांनी 'ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. सृष्टी आणि सबब या दोघांच्या यशाची चर्चा सध्या शहरात जोरदार सुरू आहे.