रायगड : सातारा येथून वरात घेऊन टेम्पो (MH 08 G 3027) पोलादपूर येथील कुडपण येथे येत असताना 300 फूट दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून, दरीतून 64 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात रेस्क्यू पथकाला यश आले आहे. अवकाळी पावसाने रस्ता निसरडा झाला असल्याने चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे.
जखमी 64 जणांपैकी 33 जण गंभीर जखमी असून 31 जण किरकोळ जखमी आहेत. यांपैकी ४३ जखमींना महाड, पोलादपूर आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. तर, सहा रुग्णांना नवी मुंबई आणि अलिबाग येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. लग्न वऱ्हाड घेऊन जातानाचा हा महाड पोलादपूर तालुक्यतील दुसरा अपघात आहे. आरोग्य यंत्रणा, महसूल यंत्रणा, पोलीस, साळुंखे ट्रेकर, खेडमधील मदत संस्था घटनास्थळी दाखल झालेली आहे.
तिघांचा मृत्यू..
या अपघातात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. तुकाराम झोरे (40, कुंभारडे), हरिश्चंद्र भावेश होगडे (22, तुळशी धनगरवाडी) आणि विठोबा भागोशी झोरे (65, खवटी) अशी मृतांची नावे आहेत. यातील दोघांचा मृत्यू घटनास्थळीच झाला होता. तर, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
300 फूट दरीत कोसळला टेम्पो..
पोलादपूर तालुक्यातील कुडपण येथील एका तरुणाचे सातारा येथील मुलींबरीबर आज लग्न होते. यासाठी कुडपण येथून वऱ्हाडी मंडळी सातारा येथे गेली होती. साताऱ्याच्या लग्न आटोपून वरात घेईन वऱ्हाडी टेम्पोने कुडपण येथे येण्यास निघाली. यावेळी कुडपण धनगरवाडी येथे टेम्पो सायंकाळी साडेसहा वाजता आला असता चालकाचे नियंत्रण सुटून टेम्पो बाजूच्या खोल दरीत 300 फूट खाली कोसळून अपघात झाला.
रेस्क्यू ऑपरेशन द्वारे 65 जणांना काढले बाहेर..
अपघाताची माहिती कळताच जिल्हा प्रशासनाची यंत्रणा तातडीन दाखल झाली. साळुंखे रेस्क्यू पथक, खेडमधील मदत रेस्क्यू पथक, पोलीस, डॉक्टर, महसूल यंत्रणा दाखल होऊन बचाव कार्य सुरू केले. 300 फूट दरीत उतरून बचाव पथकाने दोन मृतदेह आणि 65 जणांना बाहेर काढले आहे. जखमींना महाड पोलादपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.
अवकाळी पावसामुळे झाला अपघात..
दोन दिवसांपासून जिल्ह्यातील महाड, पोलादपूर तालुक्यात अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे या तालुक्यातील रस्ते हे निसरडे झाले आहेत. पोलादपूर-कुडपण हा रस्ता घाटमाथ्याचा असल्याने पावसामुळे निसरडा झाला आहे. निसरड्या रस्त्यामुळे टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटून वरातीचा टेम्पो हा 300 फूट दरीत कोसळून अपघात झाला.
12 जखमींची प्रकृती स्थिर...
44 जखमींपैकी 12 जखमींची प्रकृती स्थिर असून त्यांना प्रथमोपचार करून रत्नागिरीला पाठविण्यात आले आहे. एका व्यक्तीला गुडघ्याला फॅक्चर आहे. त्यास महाड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.