पनवेल - शहरामध्ये बुधवारी दिवसभर सुरू असलेल्या जोरदार पावसाबरोबरच आलेल्या वादळी वाऱ्यामुळे खांदा कॉलनीत झाड उन्मळून पडल्याची घटना घडली. खांदा कॉलनीतील सेक्टर 8 मध्ये असलेल्या ए टाईप बिल्डिंगजवळ हे झाड पडले. सुदैवाने या परिसरातून कुणाचेही येणे जाणे नसल्याने जीवितहानी टळली.
पुढील काही तासात मुंबईसह उपनगरात जोरादार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नवी मुंबईसह पनवेलमध्ये बुधवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. या पावसाने नागरिकांना दिलासा दिला असला तरी अनेक ठिकाणी मोठी झाडे पावसामुळे उन्मळून पडली आहेत.
खांदा कॉलनीत सेक्टर 8 मध्ये सिडकोने ए टाईपची घरे उभारली आहेत. याच इमारतीच्या संरक्षक भिंतीच्या आत त्यावेळी झाडेदेखील लावण्यात आली होती. आता ही झाडे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. सिंहगड इन्स्टिट्यूट येथे सुरक्षाभिंत कोसळून सहा कामगार ठार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या ठिकाणी सुरक्षाभिंतींमध्ये सहा झाडांच्या मुळ्या घुसल्याचे चित्र दिसले. झाडे मोठी झाल्यानंतर त्यांच्या मुळ्या सुरक्षाभिंतीमध्ये घुसतात आणि भिंती पडण्याच्या घटना सर्रास घडतात.
बुधवारच्या मुसळधार पावसात खांदा कॉलनीत सेक्टर 8 मध्ये हे झाड कोसळण्यावेळी रस्त्यावर वर्दळ नव्हती. त्यामुळं सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक एकनाथ गायकवाड, नगरसेविका सीताताई सदानंद गायकवाड, माजी नगराध्यक्ष गणेश पाटील, सचिन गायकवाड आणि शांताराम महाडिक यांनी त्वरित त्या ठिकाणी धाव घेऊन संबंधित सिडको अधिकार्यांशी संपर्क साधून पदपथ मोकळा करून दिला.
सुरक्षाभिंतीच्या कडेला लावण्यात येणाऱ्या झाडांच्या मुळ्या सुरक्षाभिंतींमध्ये घुसून या भिंती पडण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने, झाडे आता सुरक्षाभिंतींच्या मुळावर आल्याचे चित्र पनवेल शहरात जागोजागी दिसू लागले आहे. सुरक्षाभिंती कोसळण्याच्या किरकोळ घटनांकडे डोळेझाक करण्यात येते. त्यामुळे पनवेल शहरात सिंहगड इन्स्टिट्यूट सारखी घटना घडू नये, अशी चिंता माजी नगराध्यक्ष गणेश पाटील यांनी व्यक्त केली.