रायगड : कर्तव्यावर जाण्यास नकार दिल्याने अलिबाग आगारातील 31 चालक, वाहक यांना जिल्हा वाहतूक नियंत्रक यांनी 28 जुलैरोजी निलंबित केले होते. याप्रकरणी निलंबित चालक, वाहकाच्या प्रतिनिधींनी परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली. त्यानंतर परिवहन मंत्र्यांनी त्वरित परिवहन अधिकारी यांना चालक, वाहक यांचे निलंबन रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी यांच्या मदतीने चालक आणि वाहक यांचा हा प्रश्न सुटला आहे.
अलिबाग आगारातील चालक, वाहक यांनी दादर पनवेल ड्युटी करण्यास नकार दिल्याने जिल्हा वाहतूक नियंत्रक यांनी 31 जणांवर निलंबनाची कारवाई केली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला होता. एसटी प्रशासनाने लावलेल्या ड्युटीमध्ये नियोजन नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांनी ड्युटी करण्यास नकार दिला होता. कामगार प्रतिनिधी यांनी आज(मंगळवार) पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी यांच्यासह परिवहन मंत्री अनिल परब याची मंत्रालयात भेट घेतली.
कामगार प्रतिनिधी यांनी परिवहन मंत्री यांच्यासमोर आपली व्यथा मांडून केलेले निलंबन हे अन्यायकारक असल्याचे सांगितले. त्यानंतर त्वरित परिवहन मंत्री अनिल परब यांनी संबंधित अधिकारी यांना आदेश देऊन कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करण्याचे आदेश दिले. कर्मचारी यांनीही त्वरित हजर होणार असल्याचे सांगत अलिबाग दादर ड्युटी करणार असल्याचे कबूल केले आहे.