रायगड- आज सकाळी मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी बघायला मिळाली. यावेळी खालापूर टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून दिवाळीच्या सुट्टीमुळे प्रवासी वाहनांची संख्या वाढली आहे. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे.
खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा
मुंबई-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर लांबच-लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त मुबंईतील अनेक चाकरमानी आपल्या गावी जात असतात. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या गाड्यांची गर्दी मुंबई-पुणे महामार्गावर झाली असून खालापूर टोलनाक्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जवळपास २ ते ३ किमीपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या असून दिवाळीसाठी गावाकडे जाणाऱ्यांचे हाल होत आहेत. ही वाहतूक कोंडी साेडविण्यासाठी वाहतूक पोलिसांचे प्रयत्न सुरू असून टोल न घेता वाहनांना सोडण्यात येत आहे. ही वाहतूक कोंडी दुपारपर्यंत सुटेल, असा विश्वास वाहतूक पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मंदिरे खुली होत असल्यानेही वाहनांची गर्दी
दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाच्यावतीने नियमावली लागू करण्यात आली होती. ती आता शिथील झाली आहे. त्यामुळे लोकांनी प्रवास करण्यास सुरूवात केली आहे. तसेच आता मंदिरेही उघडली जाणार आहेत. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत देवदर्शनासाठीही लोक प्रवास करत आहेत. त्यामुळे ही वाहनांची गर्दी होताना दिसत आहे.
हेही वाचा- सेक्युलर म्हणणारे सर्वात अधिक धर्मांध - संजय राऊत