रायगड - जिल्ह्यात दोन दिवस पावसाने मुसळधार सुरुवात केली आहे. रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. माणगाव श्रीवर्धन रस्त्यावर पहाटेच्या सुमारास घोणसे घाटात दरड कोसळली आहे. दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आलेला आहे. दरड काढण्याचे काम सुरू आहे.
हवामान विभागाने 4 ते 6 ऑगस्टला जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. जिल्हा प्रशासनानेही नदी, समुद्र किनारी गावांना तसेच दरडग्रस्त भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांनीही आपली पातळी ओलांडली आहे. रात्रभर पाऊस पडत असल्याने माणगाव श्रीवर्धन मार्गावरील घोणसे घाटात दरड कोसळली आहे. बांधकाम विभाग आणि ठेकेदाराकडून ही दरड काढण्याचे काम सुरू आहे. तूर्तास तरी हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आलेला आहे.
रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासात १४३.८८मिमी पावसाची नोंद झाली आहे. माणगाव येथे ३२६ मिमी, तळा येथे २६५ मिमी, पोलादपूर २०८, रोहा २१०, सुधागड २०३ मिमी, म्हसळा १७६, श्रीवर्धन १५८, महाड १४७, माथेरान १४०.८० पावसाची नोंद झाली आहे.