रायगड - कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची रायगडात 28 एप्रिल रोजी आलेली कोविफॉर (HCL21013)ही बॅच खराब निघाली आहे. जिल्ह्यात 120 कोरोना रुग्णांना या बॅचचे इंजेक्शन देण्यात आले होते. यापैकी 90 जणांना याचे दुष्परिणाम जाणवू लागले होते. त्यावर डॉक्टरांनी त्वरित या रुग्णांवर उपचार करून त्यांना सुस्थितीत आणले आहे. परिणामी अन्न व औषध प्रशासन विभागाने त्या बॅचच्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर थांबविण्याबाबतचे आदेश जिल्ह्यातील रुग्णालयाला दिले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनचा रोज होत आहे पुरवठा
अतीगंभीर कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन देऊन त्यांना बरे केले जाते. सध्या या इंजेक्शनचा पुरवठा रुग्णांना त्वरित व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील रुग्णालयाला अन्न व औषध प्रशासनाकडून रोज रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवठा केला जातो.
90 जणांना झाला इंजेक्शनचा साईड इफेक्ट
28 एप्रिल रोजी महाड येथील डिस्ट्रीब्यूटरतर्फे जिल्ह्यातील खासगी व शासकीय रुग्णालयाना 500 रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला होता. त्यानुसार 120 जणांना आज रेमडेसीविर इंजेक्शन देण्यात आले. इंजेक्शन दिल्यानंतर यातील 90 जणांना अचानक त्रास जाणवू लागला. याबाबत जिल्हा प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर शासनाकडे याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर 28 एप्रिल रोजी आलेली रेमडेसिवीर इंजेक्शन बॅच मधील इंजेक्शन देऊ नका, असे पत्र अन्न व औषध विभागाकडून काढण्यात आले आहे.
हेथ्रो हेल्थकेअर लिमिटेडचे संचालक एन बोस यांनी इंजेक्शनचा वापर थांबविण्याबाबत पत्र अन्न व औषध विभागला दिले असून त्यानुसार हे पत्र अन्न व औषध प्रशासनाने सर्व रुग्णालयाला पाठविले आहे.