रायगड - जिल्ह्यासह मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघरमध्ये घरफोड्या आणि चोर्याकरून पोलिसांपुढे आव्हान उभे करणार्या तीन चोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. खोपोली पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी केली. आरोपींकडून साडेसात लाख रुपये किंमतीचे 22 तोळे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने हस्तगत केली आहेत.
तीन चोरट्यांचा केला सीसीटीव्हीमार्फत तपास -
खोपोली शहरात होत असलेल्या घरफोडीबाबत पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला होता. गुन्हे घडणाऱ्या ठिकाणी तसेच शिळफाटा, चौक फाटा, नवी मुंबई व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा करून त्याद्वारे चोरट्याचा तपास खोपोली पोलिसांनी सुरू केला. यामध्ये संशयित चोरट्याची माहिती पोलिसांना मिळाली. अभिषेक नितीन मिस्त्री (वय 24, रा. महेश पार्क, उमा निवास, ए विंग, रुम नं. 403 नालासोपारा ईस्ट ठाणे), नरेंद्र उर्फ निखील हरपाल सिंग उर्फ सुफियाना खान (रा. रुम नंबर 7, प्लॉट नं.73 एनसीसी अब्दुल हमीद रोड गेट नं.7 मालवणी मालाड वेस्ट मुंबई), यतीन प्रविण सिग्रोजा (वय 32, रा. रुम नं.8 आंबिका सॉमिल कंपाऊंड, सरदार चाळ जास्मीन अपार्टमेन्ट समोर भराडवाडी रोड आंबोली, अंधेरी (प.) या चोरट्या टोळीची नावे पुढे आली.
साडेसात लाखाचा सोन्याचा ऐवज केला जप्त -
खोपोली पोलिसांनी सापळा रचून या तिघांना अटक केली. या तिघांना पोलिसी खाक्या दाखवल्यावर मुंबई, ठाणे, पालघर व नवी मुंबई येथे त्यांनी 10 ते 15 चोरी व घरफोडीचे गुन्हे केले असल्याचे कबूल केले. खोपोली पोलिसांनी केलेल्या अधिक चौकशीत खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी, चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले. या दोन्ही घटनांमध्ये 7 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 22 तोळे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत. अधिक तपास अमोल वळसंग हे करत आहेत.
या पथकाने केली कारवाई -
पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अमोल वळसंग, पोलीस हवालदार राजेंद्र पाटील, विकास पाटील, पोलीस अंमलदार सतिश बांगर, कादर तांबोळी, दत्तात्रय नुलके, प्रविण भालेराव, प्रदिप खरात यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.
तिघेही सराईत गुन्हेगार -
अटक केलेले अभिषेक मिस्त्री, नरेंद्र सिंग उर्फ सुफियान खान व यतिन सिग्रोजा हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी मुंबई, नवी मुंबई, पालघर व ठाणे या भागात गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. खोपोली पोलीस ठाण्याव्यतिरिक्त रायगड जिल्ह्यातील पेण, नवी मुंबई येथील खांदेश्वर, पनवेल शहरातही त्यांनी चोर्या, घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.