रायगड - जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात पाभरे गावामध्ये एका राहत्या घरात रात्रीच्या वेळेस चोरांनी आपला हात साफ केला असून तब्बल ३५ तोळे सोने,रोकड व तांबे व जर्मनच्या भांड्यांची चोरी केली आहे. तालुक्यात थंडीच्या दिवसातील ही पहिली चोरी असल्याने थंडी आली आणि चोऱ्यांना सुरवात झाली, अशी चर्चा देखील सुरू झाली आहे.
तालुक्यातील मौजे पाभरे गावातील खलील इब्राहीम घराडे यांच्या घरात दोन महिला व एक युवक गाड झोपेत असताना गुरुवारी पहाटेच्या वेळेस काही अज्ञात चोरट्यांनी घराच्या छतावरील कौले काढून घरात प्रवेश करून चोरी केली. या चोरी मध्ये चोरट्यांनी साडेपाच तोळ्याचे हार, पाच तोळ्याचे सोन्याचे बिस्किट, एक तोळ्याची सोन्याची चेन, दीड तोळ्याची एक जुनी चेन व पेंडळ यांच्यासहित बांगड्या, मंगळसूत्र, कानातील फुलजोडे, जुंबर, सोन्याच्या कुड्या असे एकूण पस्तीस तोळ्याचे दागिने व इतर जुनी भांडी, ड्रेसपीस व रोकड वर आपला हात साफ केला.
पाभरे येथे झालेल्या चोरीची माहिती मिळाल्या नंतर उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव पावर, पोलिस निरीक्षक अश्वनाथ खेडकर, पोलीस हावालदार चव्हाण, मोरे व पोलीस नाईक सूर्यकांत जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी करून त्वरित अलिबाग मुख्यालयातून स्वान पथक व ठसे तज्ञ यांना बोलाऊन घेतले. घराडे यांनी दिलेल्या तक्रारी वरुण अज्ञात चोरट्याविरोधात म्हसळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास उप विभागीय पोलिस अधिकारी बापूराव पावर यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस निरीक्षक अश्वनाथ खेडकर आणि त्यांचे सहकारी करत आहेत.