पेण (रायगड) - पेण-खोपोली बायपास रस्त्यावर गणपतीवाडीनजीक नियंत्रण सुटलेल्या कार चालकाने समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने एका स्थानिकाचा जागीच मृत्यु झाला. गावकऱ्यांनी रस्ता रोको केल्याने काहीकाळ तणावपूर्ण वातावरण होते.
पेण-खोपोली बायपास रोडचे काम गेले 2 वर्ष संथगतीने सुरु आहे. वर्षभर अर्धवट स्थितीत असलेल्या गणपतीवाडी येथील चढणीवर अनेक ठिकाणी मोठे मोठे दगड पडली आहेत. तसेच पावसामुळे रस्ताही खचला आहे. अनेकदा या गावातील नागरिकांनी सदरील कामाच्या बाबत अधिकारी व ठेकेदाराशी संपर्कही केलेला होता. मात्र ठेकेदाराकडून नेहमीच दुर्लक्ष केले गेले. आज याच ठिकाणी पनवेलच्या दिशेने जाणारी कार क्र.MH 06 BE 3242 वरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने खोपोलीच्या दिशेने येणाऱ्या हटकेश्वर कंपनीचा ट्रक क्रमांक MH 12 RN 2393 याला जोरदार धड़क दिल्याने गणपतीवाडी येथील कारचालक सुरेश कदम याचा जागीच मृत्यू झाला.
अपघात झाल्याचे समजताच गावकऱ्यांनी काही तास रस्ता बंद करून ठेवला होता. पोलीस आणि गावकरी यांच्यात शाब्दिक बाचाबाची ही झाली. मृताच्या नातेवाइकांनी आर्थिक मदत करण्याची आणि रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी यावेळी गावकऱ्यांनी पेणचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक जितेंद्र पोळ यांच्याकडे केली. सदर अपघाताची नोंद पेण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.