रायगड - राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्र्यांची निवड प्रत्येक जिल्ह्यात केली आहे. रायगडमधील शिवसेनेच्या पक्षांतर्गत भावना असतील तर, त्या पक्षप्रमुख यांच्याकडे मांडण्याचा अधिकार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील घटक पक्षाना एकत्रित घेऊन पालकमंत्री अदिती तटकरे काम करतील, अशी प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरे यांनी दिली.
रायगडचे पालकमंत्री पद हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांना दिल्याने रायगड शिवसेना नाराज झाली आहे. याबाबत अलिबाग येथे खासदार सुनील तटकरे आले असता त्यांना शिवसेनेच्या नाराजीबाबत प्रश्न विचारले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकमेव आमदार अदिती तटकरे याना राज्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिल्याने रायगडमधील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक नाराज झाले आहेत, याबाबत रोहा येथे बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत पालकमंत्री हटाव, अशी भूमिका घेतली आहे. याबाबत खासदार तटकरे याना प्रश्न विचारला असता त्यांनी सर्वांना सोबत घेऊन पालकमंत्री अदिती तटकरे काम करतील, अशी प्रतिक्रिया दिली.