रायगड - रोहा औद्योगिक क्षेत्रात असलेल्या सुदर्शन कंपनीत रात्री आग लागल्याची घटना घडली होती. आगीने रौद्ररूप धारण केले हाते. आकाशात आगीचे लोट पसरले होते. दोन अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र कंपनीचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
सुदर्शन कंपनीत पीसीएस प्लांटच्या वरच्या मजल्यावर रात्री साडे अकराच्या दरम्यान आग लागली. ही आग अर्ध्या तासाने विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. कंपनीत लागलेली आग ही विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज, प्रांताधिकारी यशवंत माने यांनी व्यक्त केला.
पोलीस, प्रांताधिकारी, आमदार घटनास्थळी दाखल -
आगीची माहिती कळताच आमदार अनिकेत तटकरे, प्रांताधिकारी यशवंत माने, पोलीस, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलाच्या दोन पथकाने आग आटोक्यात आणली.
रोहा औद्योगिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर -
रोहा औद्योगिक क्षेत्र हा केमिकल कंपनींचा परिसर आहे. त्यामुळे अनेकवेळा कंपन्यांमध्ये आग लागून, स्फोट होतात. या स्फोटात अनेकांचे प्राणही गेलेले आहेत. मात्र औद्योगिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत प्रशासन गंभीर दिसत नाही. त्यामुळे येथील कर्मचारी, नागरिकांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे.