रायगड - कोरोनाच्या महमारीत आज धुलिवंदन जिल्ह्यात साजरे झाले. नेहमी धुलिवंदन मोठ्या उत्साहात साजरे केले जात असे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पुन्हा शासनाने नियमावली जाहीर केली असल्याने धुलिवंदनावर कोरोनाचे सावट दिसत होते. दरवर्षी जिल्ह्यातील समुद्रकिनारे धुलिवंदन दिवशी पर्यटक आणि स्थानिकांनी बहरलेले असायचे. यावेळी समुद्रकिनारे काही प्रमाणात सुनसान दिसत होते. त्यामुळे धुलिवंदन कोरोनाच्या सावटाखाली साधेपणाने साजरा करण्यात आले.
धुलिवंदन साधेपणाने साजरे -
रंगाची बरसात करून धुलिवंदन सण हा होळी पौर्णिमा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यावेळी एकमेकाला रंग लावून रंगात सर्वजण न्हाहून निघत असतात. होळीच्या आगीत रुसवे फुगवे टाकून पुन्हा एकदा नात्याचे रंग धुलिवंदनच्या निमित्ताने निर्माण होतात. असा हा धुलिवंदनाचा सण आज जिल्ह्यात साजरा करण्यात आला.
कोरोनाच्या सावटाखाली धुलिवंदन साजरे -
मार्च 2020 पासून कोरोना महामारी सूरु झाली होती. मात्र, होळी आणि धुलिवंदन हा सण कोरोना आधी साजरा झाला होता. पुन्हा आता मार्च महिन्यापासून कोरोनाने डोके वर काढले. त्यामुळे होळी आणि धुलिवंदन सणावर कोरोनाचे सावट होते. शासनानेही कोरोनाच्या अनुषंगाने धुलिवंदन सण साजरा करण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली होती. त्यामुळे धुलिवंदन साजरा करताना यावेळी कोरोनाचे सावट दिसत होते.
गावात, सोसायटीमध्ये रंगाची बरसात -
धुळीवंदन सणावर कोरोनाचे सावट असले तरी जिल्ह्यात गावामध्ये, सोसायटीमध्ये रंगाची उधळण होताना दिसत होती. कोरोनाच्या नियमाचे पालन करून रंगाची उधळण करताना बच्चे कंपनी, महिला, वृद्ध हे रंगात रंगलेले दिसत होते. त्यामुळे वातावरणातही सप्तरंग पसरलेले दिसत होते.
समुद्रकिनारी यावर्षी तुरळक गर्दी -
धुलिवंदन खेळून झाल्यानंतर स्थानिक तसेच पर्यटक समुद्रकिनारी जात असतात. त्यामुळे समुद्रकिनारी धुलिवंदनवेळी तुफान गर्दी असते. मात्र, मार्च महिन्यात पुन्हा कोरोना आल्याने धुलिवंदन सणावर बंधने होती. मुंबई, पुणे शहरात धुलिवंदन खेळण्यास बंदी असल्याने अनेकजण रायगडात दाखल झाले होते. त्यामुळे पर्यटक समुद्रकिनारी धुलिवंदन खेळताना दिसत होते. मात्र, स्थानिकांची गैरहजेरी यावेळी प्रामुख्याने दिसत होती. त्यामुळे दरवर्षी बहरणारे समुद्रकिनारे हे तुरळक पर्यटकांनी भरलेले दिसत होते.