रायगड - घरातील प्रमुख कमावती व्यक्ती एखाद्या गंभीर आजाराने ग्रासली गेली की सारे कुटूंब आर्थिक संकटात ओढले जाते. अशीच परिस्थिती अलिबाग तालुक्यातील नागावचे रहिवासी श्रीकांत म्हात्रे याच्या कुटूंबाची झाली आहे. श्रीकांत म्हात्रे यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या असल्याने गेल्या चार वर्षांपासून आठवड्यातून तीन वेळा त्यांना रक्तशुद्धीकरण करावे लागत आहे. अशाही परिस्थितीत परावलंबी जीवन जगत असताना बॅटरी चार्ज व्यवसायातून म्हात्रे हे आपल्या कुटूंबाचा चरितार्थ चालवत आहेत. किडनी डेच्या निमित्ताने श्रीकांत म्हात्रे याच्या बाबत ईटीव्ही भारतने घेतलेला हा आढावा.
सुखी संसारात पडला मिठाचा खडा -
अलिबाग तालुक्यातील नागाव येथील रहिवासी श्रीकांत म्हात्रे हे व्यवसायाने आटो मकेनिक आहेत. नागाव येथील सिद्धिविनायक मंदिरच्या मागे त्याचे घर आणि गॅरेज आहे. म्हात्रे याना एक मुलगा दोन मुली आणि पत्नी असा सुखी संसार आहे. दोन्ही मुलीची लग्न झालेली असून त्या आपल्या पतीच्या घरी सुखाने नांदत आहे. मुलगा सिद्धेश याने बारावीचे शिक्षण पूर्ण केले असून महाड येथे फार्माचे शिक्षण तो घेत आहे. श्रीकांत म्हात्रे याचे एक घर असून इतर काहीही संपत्ती नाही आहे. आपल्या गॅरजेच्या व्यवसायात त्यांनी कुटूंबाचा चरितार्थ चालवला आहे. साठ वर्ष वयापर्यंत काहीही आजार नसलेल्या म्हात्रे ना मात्र चार वर्षांपूर्वी बीपीच्या त्रासाने ग्रासले आणि सुखी संसारात मिठाचा खडा पडावा असे सारे आयुष्य बदलून गेले.
चार वर्षांपासून सुरू आहे रक्तभिसरण प्रक्रिया -
श्रीकांत म्हात्रे याना बीपीचा त्रास झाल्यानंतर त्यांना गोळ्या सुरू करण्यात आल्या. मात्र, जास्त औषधांच्या सेवनामुळे म्हात्रे याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. त्यामुळे मुंबई के इ एम रुग्णालयात डायलिसिस सुरू करण्यात आले. घरची परिस्थिती बेताची असूनही त्याच्या विवाहित मुलींनी खर्च केला. त्यानंतर अलिबाग येथे लोटस या खासगी लॅबमध्ये दिवसात अकराशे रुपये खर्च करून डायलिसिस सुरू झाले. अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात डायलिसिस सुविधा होती. मात्र, नंबर लागत नसल्याने खासगी रुग्णालयात डायलिसिस सुरू होते. अखेर जिल्हा सामान्य रुग्णालयात 2017ला त्यांचा नंबर लागल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत गेली चार वर्षांपासून त्याच्यावर मोफत डायलिसिस सुरू आहे.
किडन्या निकाम्या झाल्याने म्हात्रेचे आयुष्य बदलले -
औषधाच्या अति सेवनामुळे म्हात्रे यांच्या किडन्या निकाम्या झाल्या आणि त्याचे आयुष्यच बदलून गेले. स्वतःच्या हिमतीवर उभा केलेला संसार आजार पणामुळे आर्थिक संकटात सापडला. किडनी निकामी झाल्याने गॅरेज चे काम करण्यास कठीण जाऊ लागले. गॅरेज व्यवसायात असलेला त्याचा भागीदार मित्रही अचानक गेल्याने आणि स्वतः डायलिसिस उपचार घेत असल्याने कुटंब कसे चालवायचे, मुलाचे शिक्षण कसे पूर्ण करायचे हा यक्ष प्रश्न त्याच्या समोर उभा राहिला. अखेर घरखर्च चालवण्यासाठी त्यांनी बॅटरी चार्जिंग व्यवसाय सुरू केला. मात्र, हल्ली तो व्यवसायही हवा तसा चालत नाही. मुलीच्या मदतीमुळे मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न सुटला असला तरी वर्ध्याक्याकडे वळलेल्या श्रीकांत म्हात्रे यांच्या चेहऱ्यावर किडनी निकामी झाल्याने आपण कुठे तरी हतबल झालो असल्याच्या खुणा दिसत आहेत. मात्र, असे असले तरी जिवंत असेपर्यंत कुटूंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी आजही श्रीकांत म्हात्रे याची धडपड सुरू आहे. या आजारातून ते खूप काही शिकले आहेत, हे त्याच्या चेहऱ्यावरून दिसत आहे.