रायगड - महाराष्ट्रात महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडीत अखेर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन झाली. या महाआघाडीच्या माध्यमातून राज्यात सरकार स्थापन होऊन उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. हा फॉर्म्युला आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चालेल, अशी शक्यता रायगडमध्ये बोलली जात होती. त्याचा प्रत्यय माणगाव तालुक्यातील निजामपूर जिल्हा परिषद गट पोटनिवडणुकीत आला.
राज्यात महाविकास आघाडीद्वारे सर्व पक्ष एकत्र आल्याने निजामपूर पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या वासंती संतोष वाघमारे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचा पॅटर्न हा पहिल्यांदा रायगडमधून सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
माणगाव तालुक्यातील निजामपूर जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या द्रौपदी पवार या सदस्यपदी निवडून आल्या होत्या. मात्र, २९ एप्रिल २०१९ रोजी द्रौपदी पवार यांचे सर्पदंशाने निधन झाले. त्यामुळे, निजामपूर गटाची जागा रिक्त झाली होती. त्यानंतर या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. शिवसेनेकडून वासंती वाघमारे, मदीना बळीराम कोळी, गौरी तुकाराम मोरे, हिराबाई दत्ताराम वाघमारे, माधुरी मनोहर साबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, सर्व महाविकास आघाडीच्या पक्षीय नेत्यांनी यशस्वी मध्यस्ती करून इतर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झली. यामध्ये शिवसेनेच्या वासंती वाघमारे यांची जिल्हा परिषद सदस्यपदी बिनविरोध निवड झाली.
हेही वाचा - 'उद्यमात सकल समृद्धी’ दर्शविणारी तळोजा एमआयडीसी प्रदूषणाच्या जाळ्यात; गावकरी त्रस्त
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख अनिल नवगुणे, सुभाष केकाणे, सुधार पवार, राजाभाऊ रणपिसे, संजय घाग, गणेश समेळ, मिलिंद फोंडके, किरण पागार, तुकाराम सुतार, रमेश दबडे, सुरेन्द्र पालांडे, शिवा घाग यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा - पनवेलमध्ये शिक्षिकेचा उपायुक्तांविरोधात महापालिकेवर मोर्चा