रायगड - छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्यभिषक सोहळा आज रायगड किल्यावर सोशल डिस्टन्सिंग पाळून अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला आहे. खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची यथासांग पूजा केली.
शिवभक्तांनी कोरोनाच्या संकटकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांना घरूनच वंदन केले याबद्दल त्यांचे आभार. पोलीस, डॉक्टर, परिचारिका प्रशासन हे कोरोना संकटात अहोरात्र काम करत आहेत. त्याची आता आपण सेवा करायची आहे. तरच छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श निर्माण होऊ शकेल, अशा भावना छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी व्यक्त केल्या. तसेच यावेळी कोरोना योध्याचा सन्मान खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा 347 वा शिवराज्यभिषक सोहळा आज रायगड किल्यावर संपन्न झाला. कोरोनाचे संकट असल्याने मोजक्याच शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवराज्यभिषक सोहळा साजरा झाला. यावेळी राजसदरेवर खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छबीची पूजा केली. होळीच्या माळरानावर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळी जाऊन वंदन केले. कोरोनाच्या संकटामुळे शिवभक्तांना घरूनच वंदन करण्याचे आवाहन राजेंनी केले होते.
शिवराज्यभिषक सोहळ्यात खंड पडणार नाही, असा शब्द शिवभक्तांना दिला होता. त्यादृष्टीने कोरोनाचे संकट असतानाही सोहळा साजरा करण्यात आला असून शासनाचे मी आभार मानत आहे. असे खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे म्हणाले.