रायगड - शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत या संकल्पनेतून पनवेल कृषि उत्पन बाजार समिती आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमधील उलवे नोडमध्ये आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आमदार बाळाराम पाटील यांनी या आंबा महोत्सवाच उद्घाटन केले. यावेळी बाळाराम पाटील यांनी स्वतः या आंब्याची चव चाखत शेतकरी बंधूंची संवाद साधला.
गेल्या २ वर्षांपासून हा महोत्सव होत आहे. कोकणातील जगप्रसिद्ध हापूस आंबा रत्नागिरी आणि देवगड येथील शेतकऱ्यांच्या बागेतून थेट मुंबईकरांपर्यंत दलाल आणि हुंडेकरी यांना डावलून पोहचवला जातो. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी जास्तीत जास्त दर मिळतो. पनवेलकरांना कार्बाईड विरहित अस्सल हापूस आंबा चाखायला मिळतोय. नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला केशर आणि कोकणातील हापूस आंब्याची चव चाखायला मिळत आहे. कर्नाटक व तामिळनाडू येथील हापूससदृश आंबे विकून ग्राहकांची होणारी फसवणूक या महोत्सवामुळे कमी झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा शेतकऱ्यांनी यानिमित्ताने केला आहे.
मार्चपर्यंत लांबलेली थंडी आणि थ्रिप्स रोगाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या २५ वर्षांतील सर्वात कमी म्हणजे ३० टक्केच आंब्याचे पीक हाती लागणार आहे. त्यामुळे कोकणातील शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पनवेलकरांनी या महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन सभापती राजेंद्र पाटील यांनी केले आहे.