रायगड - अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन परिषदेसाठी रायगड जिल्ह्यातील ७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर कल्याणमधील एकाची निवड झाली आहे.
जपान, रशिया, चायना या देशांबरोबरच नासा, इस्रो आणि युरोपियन देशांशी संलग्न असणाऱ्या आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन परिषदेसाठी (IAC) ७० वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीय विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या संस्थेची स्थापना १९५१ मध्ये झाली होती. या संस्थेची ही ७० वी परिषद असून आजपर्यंत एकाही भारतीय व्यक्तीची आणि संस्थेची निवड या परिषदेसाठी झालेली नव्हती. मात्र, ऑक्टोबर २०१९ मध्ये होणाऱ्या या परिषदेमध्ये सादरीकरण करण्यास ८६ देशांमधून ४३२० शोध निबंधांमध्ये महाराष्ट्रातील ८ निबंधांची निवड झाली आहे. यामध्ये भारतातील विशेष करून महाराष्ट्रातील रायगड येथील ७, तर कल्याणमधील एका विद्यार्थ्याला या परिषदेसाठी पहिल्यांदाच IAC ने निमंत्रित केले आहे.
पहिल्या शोधनिबंधामध्ये टायटन या शनीच्या चंद्रासारख्या उपग्रहावरील लहरी हवामानाचा अभ्यास केला जाणार आहे. तसेच कॅसिनी या उपग्रहाने पाठविलेल्या फोटोवरून टायटन या पृथ्वीशी साम्य असलेल्या उपग्रहाचा अभ्यास होणार आहे. या उपग्रहावर मिथेन आणि इथेनने भरलेल्या नद्या, समुद्र, डोंगर असलेल्या उणे १८० तापमानाचा उपग्रह येथे पोहेचण्यासाठी कॅसिनी अवकाश यानाला ७ वर्षे लागली. पृथ्वीबाहेर मानवी वसाहत राहू शकेल अशा ग्रहांच्या शोधमोहिमेतील टायटन या शनीच्या ५२ व्या चंद्राचा पृष्ठभागावरील बदलाचा अभ्यास करून पुढची मोहीम आखण्यासाठी ही आंतरराष्ट्रीय संस्था प्रयत्नशील आहे.
दुसऱ्या शोधनिबंधामध्ये पृथ्वी आणि मंगळ तसेच इतर ग्रहांच्या प्रदूषित वातावरणावर संशोधन करून त्या ठिकाणी मानवी शरीर कसे टिकवावे याचा समावेश आहे. दोन्ही शोधनिबंध इम्पेरियल सायंटिफिक असोसिएशनतर्फे सादर करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे इस्रोच्या वैज्ञानिकांनाही अजून अशी कामगिरी करता आली नाही. मात्र, IAC मध्ये आपल्या ग्रामीण भागातील मुले जागतिक स्तरावर अशा प्रकारे ठसा उमटवत आहेत, हे अभिमानास्पद आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर शोधनिबंधांची दखल घेणे म्हणजे इंजिनिअर मेडिकल क्षेत्रातील डिग्रीपेक्षाही फार मोठा बहुमान आहे. यामुळे ती व्यक्ती अथवा संस्थेची गुणवत्ता ठरते. पण येथेच भारतीय कमी पडताना दिसतात. आयआयटी ही भारतातील सर्वोत्तम संस्था जगात पहिल्या १०० मध्ये नाही याची खंत आहे. मात्र, अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेसाठी आपल्या देशातील ८ जणांची पहिल्यांदाच निवड होते, हेदेखील तेवढेच अभिमानास्पद आहे.
हे आठही विद्यार्थी इम्पेरियल सायंटिफिक असोसिएशनमधील असून यांना या परिषदेमध्ये त्यांना २ शोधनिबंध सादर करण्याची मान्यता देण्यात आली आहे. हर्षवर्धन देशपांडे (पेण), प्रज्ञेश म्हात्रे (पेण), विराज ठाकूर (पेण), कृपाळ दाभाडे (पेण), भक्ती मिठागरे आणि नमस्वी पाटील (अलिबाग), वृषाली पालांडे (खोपोली) आणि रिंकेश कुरकुरे (कल्याण) असे हे ८ विद्यार्थी असून या परिषदेमध्ये त्यांना २ शोधनिबंध सादरीकरण करण्यासाठी प्रत्येकी १० मिनिटांचा अवधी मिळणार आहे