मुंबई - ऐश्वर्या राय ही बच्चन फॅमिलीपासून दूर झाल्याच्या अफवा अलीकडे बऱ्याचदा ऐकू येत असतात. अभिषेक बच्चन अथवा ऐश्वर्यानं याबद्दल कधीच काही म्हटलेलं नाही. असं असलं तरी सोशल मीडियावर त्यांना फॉलो करणाऱ्यांच्या मनात नेहमी शंकेची पाल चुकचुकत असते. अलीकडे त्यांची मुलगी आराध्याचा 13 वा वाढदिवस पार पडला. त्यावेळी ऐश्वर्यानंच प्रसिध्द केलेल्या पोस्टमधील फोटोत बच्चन फॅमिलीपैकी कोणीच दिसलं नव्हतं. त्यामुळं या उफवांना अधिक चालना मिळाली होती. ऐश्वर्या राय दुबईत पार पडलेल्या 'ग्लोबल वुमन्स फोरम'मध्ये भाषण करताना दिसली. याचा एक व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आहे. यामध्ये तिच्या भाषणाच्या दरम्यान स्क्रिनवर तिच्या नावाचा उल्लेख 'ऐश्वर्या राय - आंतरराष्ट्रीय स्टार' इतकाच झाल्यानंतर आडनावातून बच्चन हटल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दुबईतील एका हाय-प्रोफाइल कार्यक्रमात ऐश्वर्या रायचे नाव 'बच्चन' आडनावाशिवाय प्रदर्शित केले गेलं. ग्लोबल वुमेन्स फोरममध्ये उपस्थित असलेल्या महिलांसमोर ऐश्वर्यानं भाषण करताना महिलांमधील नवकल्पना, दृढनिश्चय आणि लवचिकता यांना प्रोत्साहित केलं. या कार्यक्रमातील व्हिडिओ दुबई वुमन एस्टॅब्लिशमेंटच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ऐश्वर्या निळ्या रंगाच्या आकर्षक पोशाखात दिसत आहे. तिनं आपल्या भाषणानं उपस्थितांना प्रभावित केलं. मात्र तिच्या नावाचा स्क्रिनवर झालेला उल्लेख आणि त्यात बच्चन आडनावाचा समावेश नसणं यामुळे तिच्या आणि अभिषेकच्या नात्यात बिनसल्याच्या चर्चेला आणखी उत्तेजन मिळालं आहे.
'बच्चन' आडनाव वगळण्याची ही गोष्ट त्यांच्या घटस्फोटोच्या अफवा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर आली आहे. अंबानी कुटुंबाच्या हाय-प्रोफाइल लग्न सोहळ्यात ऐश्वर्या पतीबरोबर न येता मुलगी आराध्या बरोबर आली होती. त्याचवेळी अभिषेक त्याचे वडील बॉलीवूड दिग्गज अमिताभ बच्चन यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांसह दिसला होता. खरंतर, तेव्हाच या चर्चेला पहिल्यांदा सुरुवात झाली होती. त्यात अभिषेकचं नाव त्याच्या 'दसवी' चित्रपटाची सहकलाकार निम्रत कौर हिच्याबरोबर जोडलं गेल्यामुळं त्यात आणखी भर पडली होती.
"विविध पार्श्वभूमीतील आवाज बदलाची प्रेरणा देण्यासाठी, समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जगभरातील महिलांसाठी संधी निर्माण करण्याच्या सामायिक उद्देशानं एकत्र येतात तेव्हा काय साध्य करता येतं याचं हे शिखर संमेलन एक तेजस्वी उदाहरण आहे.," असं कॅप्शन दुबईतील संयोजकांनी ऐश्वर्याच्या व्हिडिओला दिलं आहे. तरीदेखील तिच्या नावात अडनाव नसल्याच्या चर्चेवर सोशल मीडियावर काही युजर्स भर देताना दिसत आहेत.