रायगड- उरण समुद्र किनारी मासे पकडण्यासाठी गेलेला 63 वर्षीय व्यक्ती चक्कर आलेने समुद्राच्या पाण्यात बुडत असताना, सीआयएसएफ जवानांनी प्रसंगावधान राखून पाण्याबाहेर काढून त्याचा जीव वाचवला आहे. याबाबतची माहिती पर्यटकांकडून मिळताच गस्तीवर असणाऱ्या सीआयएसएफ जवानांनी स्वतः पाण्याच्या लाटांवर झेप घेऊन बचाव कार्य केले आहे.
उरण येथील पिरवाडी समुद्रकिनारा पर्यटन स्थळच नसून, येथील स्थानिकांच्या उदरनिर्वाहाच मुख्य स्रोतही आहे. यामुळे येथील स्थानिक मासेमारीसाठी या किनारपट्टीचा वापर वर्षानुवर्षे करीत आहेत. अशाचप्रकारे किनारपट्टीला लागून असणाऱ्या नागाव येथील रहिवाशी 63 वर्षीय प्रभाकर म्हात्रे हे बुधवारी मासे पकडण्यासाठी समुद्रकिनारी गेले होते. मासेमारी करत असताना उन्हाची दाहकता सहन न झाल्याने म्हात्रे यांना भोवळ आली आणि ते पाण्याच्या लाटांमध्ये बुडू लागले. यावेळी किनारपट्टीवर असणाऱ्या पर्यटकांना याचा अंदाज आल्याने पर्यटकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. ही बाब पर्यटकांनी ओएनजीसी कंपनीच्या सुरक्षेसाठी तैनात असणारे सीआयएसएफ जवान विजय माने व लालू एस. यांच्या निदर्शनास आणून दिली.
हेही वाचा-सचिन वाझेचा 'कार'नामा; सात आलिशान गाड्या एनआयएच्या ताब्यात
पर्यटकांनी मानले जवानांचे आभार
क्षणाचाही विलंब न करता या दोन्ही जवानांनी समुद्राच्या पाण्यात उतरून प्रभाकर म्हात्रे यांना पाण्यातून बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले. सीआयएसएफ जवानांच्या प्रसंगावधानतेमुळे ज्येष्ठ नागरिकाचा जीव वाचल्याने येथील पर्यटकांनी त्यांचे आभार मानले आहेत.
हेही वाचा-नाशकात बेड न मिळाल्याने केले आंदोलन, कोरोना रुग्णाचा हकनाक गेला जीव