रायगड - लॉकडाऊन काळात शासकीय कार्यालय वगळता सर्व खासगी आस्थापना, कंपन्या बंद आहेत. शासकीय कार्यालयातही 50 टक्के उपस्थिती ठेवून काम सुरू आहे. असे असले तरी जिल्ह्यातील दुय्यम निबंधक हे गर्दीचे कार्यालय असल्याने पूर्णतः बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील मालमत्ता खरेदी, विक्रीची दस्त नोंदणी ठप्प झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील महसूलही कमी झाला होता. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या आदेशाचे पालन करून दस्त नोंदणी, ऑनलाईन दस्त नोंदणी कामकाज सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील खरेदी, विक्रीचे अडकलेले व्यवहार आता सुरुळीत पूर्ण होणार आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून जिल्ह्यात संचारबंदी लागू केली होती. गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आदेश जिल्हयात देण्यात आले होते. शासकीय कार्यालयातही कमी कर्मचारी उपस्थित राहून काम सुरू आहे. मात्र, असे असले तरी दस्त नोंदणी करणारे दुय्यम निबंधक कार्यालय हे नेहमी गर्दीने फुललेले असल्याने हे कार्यालय पूर्णतः बंद ठेवले होते. खरेदी, विक्री व्यवहार हे आपापसात होत असले तरी दस्त नोंदणी कार्यालय बंद असल्याने शासकीय स्तरावर हे व्यवहार ठप्प झाले होते. नागरिकांनी मालमत्तेची खरेदी, विक्री केली असली तरी शासकीय दस्त नोंदणी कागदाशिवाय हे व्यवहार पूर्ण होत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये बंद असल्याने नागरिक आणि वकील हे कार्यालये कधी सुरू होणार याची वाट पाहत होते.
जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये ही सुरू करण्याचे आदेश आता जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेती. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत घ्यावयाच्या दक्षतेबाबत दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून दस्त नोंदणीसंबंधी कामकाज सुरू करण्यात आली आहेत. दस्त नोंदणी करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी व वकील इत्यादींनी पुढील सूचनांचे पालन करायचे आहे. दस्त नोंदणीसाठी igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ई-स्टेप इन या सुविधेद्वारे दुय्यम निबंधक कार्यालयाच्या दूरध्वनीवर संपर्क साधून वेळ आरक्षित करणे अनिवार्य राहील. पक्षकार व वकील इत्यादींनी दस्त नोंदणीसाठी आरक्षित वेळेतच दुय्यम निबंधक कार्यालयात यावे. प्रशासन आणि शासनाने दिलेल्या आदेश आणि नियमांचे पालन करायचे आहे.
दस्त नोंदणी कार्यालयात पाच पेक्षा जास्त व्यक्ती राहणार नाहीत. कार्यालयातील गर्दी टाळण्यासाठी शोध, नक्कल, मूल्यांकन ही कामे तात्पुरती बंद ठेवण्यात येत आहेत. नागरिकांना या सेवा विभागाच्या igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या आहेत. मृत्यूपत्र, वाटणीपत्र या नोंदणी वैकल्पिक असलेल्या तसेच हक्क सोडपत्र, नात्यातील बक्षीसपत्र, चूकदुरुस्तीपत्र यासारखे कमी महत्वाचे दस्त सद्य:स्थितीत नोंदणी कामकाज बंद ठेवण्यात आली आहेत सद्य: परिस्थिती विचारात घेऊन पक्षकार व वकील इत्यादींनी वरील सूचना व इतर निर्देशाचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी शैलेंद्र साटम यांनी केले आहे.