पेण (रायगड) - गणेश मूर्तींच्या निर्मितीसाठी ओळखल्या जाणारे पेण तालुक्यातील हमरापूर, जोहे, कळवे यासह इतर भागात मातीसह प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींची मागणी वाढली आहे. मागील 15 वर्षांपासून सुरू असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींबाबत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण न्यायालयीन लढाई लढत असल्याचे महाराष्ट्र राज्य गणेश मूर्तीकार संघटनेचे सल्लागार तथा पेण संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत देवधर यांनी आज (मंगळवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
'या' आहेत प्रमुख मागण्या
यावेळी ते म्हणाले, की पेणमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तीची निर्मिती करणारे 500 हुन अधिक कारखान्यांमध्ये मातीसह प्लास्टर ऑफ पॅरिसच्या रंगबेरंगी गणेशमूर्ती तयार होत असतात. दरवर्षीपेक्षा यावर्षी मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्तींची मागणी वाढली आहे. पेणमधून तब्बल सुमारे 10 ते 12 लाख गणेशमूर्तीचे वितरण कर्नाटक, गुजरात, केरळ, आंध्रप्रदेश, गोवा या राज्यांसह परदेशातील ऑस्ट्रेलिया, अमेरिका, आशिया व युरोप खंडातील अनेक देशांमध्ये झाले आहे. याबाबत आम्ही मागील 15 वर्ष सामाजिक आणि राजकीय न्यायालयीन लढाई लढत आहोत. 2020मध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासोबत बैठक झाली होती. याबाबत जावडेकरांनी आम्हाला तोंडी आश्वासन दिले असले, तरी प्लास्टर ऑफ पॅरिसबाबत खरी लढाई प्रदुषण मंडळाविरोधात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांच्याकडे सुरू आहे. त्यामुळे पेणमधील गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये मातीसह प्लास्टर ऑफ पॅरिसच्या लाखों मूर्ती तयार असून या रंगबेरंगी गणेशमूर्तींना अधिकची पसंती भक्तांनी दिली आहे. पेणमध्ये साधारण 2 लाख 50 हजार नागरिक यावर आपली उपजीविका भागवितात. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हे प्रश्न मार्गी लावावे, अशी मागणीही सर्व गणेश मूर्तीकारांनी केली आहे. या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्य गणेश मूर्तीकार संघटनेचे अध्यक्ष अभय म्हात्रे, कैलास पाटील, दिपक समेळ, नितीन मोकल, राजन पाटील, संजय पाटील, सागर हजारे, स्वप्निल सुतार, कृणाल दाभाडे, सागर पवार आदी मूर्तीकार संघटनेचे सदस्य उपस्थित होते.