रायगड - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारीची पावले उचलली आहेत. असे असताना राज्य परिवहन विभागानेही प्रवाशांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अलिबाग आगारातील एसटी बसेस या निर्जंतुक करून स्वच्छ धुवून प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या जात आहेत. तर, दुसरीकडे एसटी बसेसच्या अनेक फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूमुळे राज्य परिवहन मंडळाच्या उत्पन्नात घट होत असली तरी प्रवाशांच्या सुरक्षेसाठीही पावले जिल्ह्यातील आगारात उचलली जात आहेत.
कोरोना हा संसर्गजन्य विषाणू असून गर्दीची ठिकाणे टाळणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यात धार्मिक, पर्यटन, समुद्र किनारे, किल्ले ही पर्यटन स्थळे नागरिकांसाठी बंद केलेली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सध्या पर्यटनस्थळावर शुकशुकाट पसरला आहे. राज्य परिवहन महामंडळालाही या कोरोना विषाणूचा आर्थिक फटका बसण्यास सुरुवात झालेली आहे. कोरोना विषाणूमुळे शाळा, कॉलेजही 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. शाळा, कॉलेज बंद झाल्यामुळे एसटी बसेसच्या फेऱ्याही रद्द करण्यात आलेल्या आहेत. तर, प्रवासी संख्या घटली असून सुरक्षेच्या दृष्टीने लांब पल्याच्या गाड्याही रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे एसटीला लाखोंचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
कोरोना विषाणू लागण ही प्रवाशांना होऊ नये यासाठी अलिबाग आगरामधील एसटी बस निर्जंतुक करून स्वच्छ केल्या जात आहेत. तसेच एसटी आगारही पाणी मारून स्वच्छ करण्यात येत आहेत. प्रत्येक एसटी बसच्या सीट, सामान ठेवायची जागा ही डेटॉलने निर्जंतुक केली जात आहे. तर, पावडर्न धुवून स्वच्छ केल्या जात आहेत. प्रवाशाच्या आरोग्याच्या दृष्टीने ही पावले उचलली आहेत. तर, चालक व वाहक यांनाही मास्क लावून स्वतःची काळजी घेण्याचे आदेश वाहतूक नियंत्रक विभागाकडून देण्यात आलेले आहेत.