रायगड - पनवेल जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, यासाठी आयोगाने अनेक उपक्रम राबवले आहेत. पनवेल मध्ये व्ही. के. हायस्कूल येथील मतदान केंद्रावर रांगोळ्या आणि फुग्यांची सजावट करण्यात आली. यामुळे हे मतदान केंद्र मतदारांचे आकर्षण ठरत आहे.
हेही वाचा... मतदान केल्याचे शाईचे बोट दाखवा अन् मिसळवर मिळवा 10 टक्के डिस्काउंट
पनवेलमध्ये मतदान केंद्राबाहेर अतिशय सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या. तर मतदान केंद्राच्या प्रवेश द्वारावर फुग्यांची सजावट करण्यात आली. इतर मतदान केंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांसह मतदारांनाही घामाच्या धारा लागल्या असतानाच, येथील सखी मतदान केंद्र मात्र सखी मतदारांनी फुलून गेले.
हेही वाचा... 'आम्ही आहोत मदतीला सर्वांनी मतदान करा', वांद्र्यातील बाल मतदार मित्रांचे आवाहन
विविध रंगांची फुले आणि फुग्यांची सजावट, तर मतदानानंतर दिले जाणारे गुलाबपुष्प. सखी मतदान केंद्राच्या निमित्ताने एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमास आल्याचा भास मतदारांना होत होता. मतदानाचा संदेश देणारी विविध कलाकृती देखील इथे आकर्षित करत होती. मतदानानंतर संपूर्ण कुटुंबासह सेल्फी काढण्यासाठी येथे सखींनी गर्दी केली. या ठिकाणी मतदानाला आलेल्या महिलांशी संवाद साधला असता, येथे येऊन अगदी कौटुंबिक सोहळ्यात आल्यासारखं वाटत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.