रायगड - म्हसळा तालुक्यातील आंबेत घाटामध्ये ऑस्ट्रेलिया देशातून फिरण्यासाठी आलेल्या तीन पर्यटक तरुणींच्या रिक्षाचा भीषण अपघात झाला आहे. अपघातामध्ये एका तरुणीला किरकोळ तर दोन तरुणी गंभीर जखमी झाल्या आहेत.
हेही वाचा - 'त्या' लाचखोर महिला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह वनपालाला 3 दिवसांची पोलीस कोठडी
ऑस्ट्रेलियातून फिरण्यासाठी आलेल्या तीन तरुणी केरलापासून दापोली येथे जात असताना बुधवारी सकाळी आंबेत घाटामध्ये उताराचा अंदाज न आल्याने त्यांच्या रिक्षाला अपघात झाला. फिरण्यासाठी आलेल्या तीन तरुणीपैकी एक तरुणी रिक्षा चालवत होती. या अपघातामध्ये विदेशी तरुणींनी आणलेली रिक्षा पलटी झाल्याने त्यामध्ये असणार्या दोन तरुणी गंभीर जखमी झाल्या असून एकीला किरकोळ मार लागला आहे.
आंबेत येथील सामाजिक कार्यकर्ते नाविद अंतुले यांच्या तत्परतेमुळे या तरुणींना प्रथम घटनास्थळीच डॉ. स्वीटी यांना पाचारण करून प्राथमिक उपचार करण्यात आला. यानंतर अंतुले यांनी या तरुणींना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी भरती केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गवळी यांना अपघाताची माहिती मिळताच व अपघातामध्ये जखमी झालेल्या तरुणी विदेशी पर्यटक असल्यामुळे त्यांनी माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना त्वरित इलाज करण्याच्या सूचना केल्या. अपघाताची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार गणेश पवार हे करीत आहेत.
हेही वाचा - विदर्भातील पराभवाची सुरुवात नागपूरपासून, जयंत पाटलांचा भाजपला टोला