रायगड - जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक 15 जानेवारीला पार पडणार आहे. रायगडचे सेना आमदार, जिल्हाधिकारी, तालुकाप्रमुख, पदाधिकारी यांची 14 जानेवारीला यासंदर्भात रोहा येथे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीनंतर शिवसेनेचा सत्तेसाठीचा दावा स्पष्ट होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी आल्याने यंदा निवडणुकीत शिवसेनाही सभापती पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा सुरू आहे.
मात्र, अन्य इच्छुक सदस्यांची देखील यासाठी धावपळ सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप यांची जिल्ह्यातील आघाडी शिवसेनेला सत्तेत सामावून घेणार का, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
2017 साली झालेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदमध्ये शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीने सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांना अध्यक्षपद तर शेकापच्या अॅड. आस्वाद पाटील यांना उपाध्यक्ष पद देण्यात आले. आता अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर शेकापकडे अध्यक्षपद आले असून योगिता पारधी अध्यक्ष तर राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांची उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे.
बांधकाम व अर्थ, पाणी, शिक्षण आरोग्य, कृषी व पशु संवर्धन, समाजकल्याण आणि बाल व महिला, या समित्यांच्या सभापती पदाची निवडणूक 15 जानेवारीला पार पडणार आहे.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी स्थापन झाली. यामध्ये शेकापनेही सहभाग घेतला आहे. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत शिवसेना तटस्थ राहिली. 14 जानेवारीला रायगड शिवसेनेची याबाबत बैठक होत असून या बैठकीनंतर जिल्हा परिषद सत्तेत शिवसेना जाणार, की नाही हे चित्र स्पष्ट होणार आहे. तर दुसरीकडे शेकापच्या पेणच्या सदस्य निलीमा पाटील यांना अध्यक्षपद न मिळाल्याने त्यांनी बांधकाम आणि अर्थ सभापतीपद मिळण्यासाठी आग्रही आहेत.