पेण (रायगड) - सुरक्षा रक्षक मंडळाच्या भरतीमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असून, या घोटाळ्यामुळे पेण तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील गोरगरीब स्थानिक बेरोजगार तरूण नोकरीपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे सुरक्षा रक्षक भरती घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी यांनी केली आहे. भरतीसाठी शेकडो बेरोजगार युवकांकडून दलालांनी प्रत्येकी हजारो ते लाखो रुपये उकळले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सुरक्षा रक्षक भरतीमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही देवा पेरवी यांनी केला. प्रत्यक्षात स्थानिक गोरगरीब बेरोजगार युवकांना रोजगार देण्याच्या दृष्टीने शासनाने सुरक्षा रक्षक मंडळाची स्थापना केली. मात्र, गोरगरीबांना नोकरी न देता या मंडळातील काही अधिकाऱ्यांनी स्थानिक दलालांना हाताशी पकडून धनदांडग्यांच्या मुलांना नोकरी देण्याचा सपाटाच लावला आहे. असेही पेरवी यावेळी म्हणाले.
1 हजार सुरक्षारक्षकांची भरती -
रायगड सुरक्षा रक्षक मंडळामार्फत जिल्ह्यातील 1 हजार सुरक्षा रक्षकांच्या पदांची भरती करण्यात येत आहे. सदरच्या भरतीची प्रक्रिया मार्च 2019 पासून सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगारांना या भरतीमुळे आपल्याला नोकरी मिळेल अशी आशा होती. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील बेरोजगार तरुणांनी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, प्रत्यक्षात मात्र नोकरी मिळवून देण्याकरिता दलालांनी लाखो रुपयांची मागणी केली असल्याचे देवा पेरवी यांनी सांगितले.
एक ते दीड लाखांची वसुली -
पेण तालुक्यात असे अनेक दलाल फिरत असून त्यांनी तालुक्यातील अनेक बेरोजगार युवकांकडून प्रत्येकी एक ते दीड लाखांची वसुली सुद्धा केली आहे. त्यामुळे हा घोटाळा कोट्यवधी रुपयांचा महाघोटाळा बनला आहे. या माहाघोटाळ्यात दलालांचा व अधिकाऱ्यांचा अर्थपूर्ण संबंध असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे.
प्रकरण उघडकीस -
मागील वर्षी 2019 ला पैसे देऊन सुद्धा आजतागायत नोकरी न मिळाल्याने बेरोजगार तरूण हतबल झाले आहेत. काही तरुणांच्या पालकांनी तर अक्षरशः व्याजी पैसे घेऊन या दलालांना दिले होते. परंतु 1 वर्ष होऊनसुद्धा नोकरी न मिळाल्याने या बेरोजगार तरुणांची धुसफूस सुरू झाली व त्यांनी दबक्या आवाजात पेण प्रेस क्लबकडे नाव न छापण्याच्या अटीवर तक्रार केली. आमच्या नावाचा उल्लेख झाल्यास आम्हाला नोकरी तसेच नोकरीसाठी दिलेले पैसे सुद्धा परत मिळणार नाही अशी व्यथाही त्यांनी मांडली.
चौकशीची मागणी -
सदरची भरती प्रक्रिया तातडीने रद्द करून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी यांनी केली आहे. तसेच सदरची भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने नव्याने करण्यात यावी अशीही मागणी त्यांनी केली.
रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष आनंद भोसले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मंडळ हे सुरक्षारक्षक मागणी करणाऱ्या संस्था व सुरक्षारक्षक उमेदवार यांच्यात समन्वय साधण्याची भूमिका पार पाडते. या भरतीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली असून, मंडळांमध्ये नोंदणीकृत उमेदवारांच्या नियुक्त्या करण्यात येतील. सदरच्या सुरक्षारक्षकांचा पुरवठा मागणीनुसार करण्यात येतो.