रायगड - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी जाहीर केली आहे. मात्र, रायगडमध्ये संचारबंदीचा पुरता फज्जा उडाल्यानंतर अखेर रायगड पोलिसांनी जिल्हाभरात धडक मोहीम हाती घेतली आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत वाहने जप्त करण्यात येत आहेत. यासाठी रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे स्वतः रस्त्यावर उतरत कारवाई करत आहे.
...अन्यथा होऊ शकते अटक
अलिबागमध्ये सकाळपासून सुरू झालेल्या या कारवाईत शेकडो वाहने जप्त करण्यात आली आहेत. गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई केली जात आहे. तरीही लोक ऐकत नसतील तर विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यावर वेळ पडल्यास अटकेची कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे. लोकांनी अत्यावश्यक काम नसताना घराबाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
गुरूवारी पहिल्या दिवशी व्यापाऱ्यांकडून संचारबंदी आणि लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर दिसत होते. विशेषतः दुचाकीवरून फिरणाऱ्यांची संख्या अनपेक्षित होती. त्यामुळे लॉकडाऊन आहे की नाही अशी शंका यावी, असे चित्र पहायला मिळाले.
पोलिसांकडून कारवाई सुरू
पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतल्यानंतर अलिबागमधील रस्ते दुपारनंतर निर्मनुष्य झाले. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्याची फेरी बंद झाली. सकाळी सुरू झालेल्या मोहिमेत पोलीस अधीक्षक यांच्यासह वाहतूक पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरला होता. पोलिसांना बघून अनेकांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडील वाहने जप्त करण्यात आली आहे. यात अनेकजण पोलिसांसोबत हुज्जत घालत होते. मात्र पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारणे थांबवले नाही.
नवीन उपाययोजना
अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश असलेली भाजीची दुकाने सुरू ठेवण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. ही बाब लक्षात घेऊन या ठिकाणी काय उपाययोजना करता येतील यावर प्रशासनाबरोबर चर्चा सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -धक्कादायक! नाशकात चक्कर येऊन एका दिवसात 9 जणांचा मृत्यू