रायगड - कोरोना अतिगंभीर रुग्णाला ऑक्सिजन अभावी राज्यात काही ठिकाणी मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. रायगड जिल्ह्यात ऑक्सिजन अभावी अद्याप एकाचाही मृत्यू झाल्याची घटना घडलेली नाही. रायगड जिल्ह्यात रोज 650 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन घेतले जात आहे. यापैकी 30 मेट्रिक टन ऑक्सिजन रायगडला वापरल्यानंतर उर्वरित 630 मेट्रिक टन ऑक्सिजन मुंबई, नवी मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा याठिकाणी वितरित केला जात आहे. त्यामुळे रायगड हा राज्याला ऑक्सिजन पुरवठा करणारा जिल्हा ठरत आहे.
जिल्ह्यात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू नाही
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील विषाणू हा अतितीव्र झाला असल्याने कोरोनाग्रस्त रुग्णांच्या फुफ्फुसावर आघात करीत आहे. रुग्णाची ऑक्सिजन घेण्याची क्षमता कमी होत आहे. त्यामुळे रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजन पुरवठा करावा लागत आहे. राज्यात सध्या ऑक्सिजन पुरवठा काही प्रमाणात कमी असल्याने इतर राज्यातून ऑक्सिजन पुरवठा शासनाला करावा लागत आहे. ऑक्सिजन कमतरतेमुळे काही जिल्ह्यात रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, याबाबत रायगड जिल्हा हा ऑक्सिजन बाबतीत अपवाद ठरला आहे.
'630 मेट्रिक टनाचे घेतले जाते उत्पादन'
रायगड जिल्ह्यात पेण डोलवी, तळोजा आणि माणगाव याठिकाणी ऑक्सिजन उत्पादन घेतले जात आहे. पेण डोलवी येथील जेएसडब्लू कंपनीत 224 मेट्रिक टन, तळोजा येथील कंपनीतून 232 मेट्रिक टन तर माणगाव येथील कंपनीतून 180 मेट्रिक टन ऑक्सिजन रोज उत्पादित होत आहे. तसेच रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयात 6 मेट्रिक टन ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आलेला आहे. तसेच जिल्ह्यात चार उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी वर्क ऑर्डर देण्यात आलेली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर ऑक्सिजनच्या मागणीची गरज संपणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.
या शहराला केला जातो पुरवठा
रायगड जिल्ह्याला सद्यस्थितीत 30 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. जिल्ह्यात 650 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादित होत आहे. त्यामुळे जिल्ह्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण केली जात असल्याने ऑक्सिजनची कमतरता रुग्णांना भासत नाही. उर्वरित ऑक्सिजन मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नांदेड, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी तसेच इतर जिल्ह्यांना पुरवठा दररोज केला जात आहे.
हेही वाचा -अमेरिकेत पूर्ण लसीकरण झालेल्यांना मास्कची सक्ती नाही!