रायगड - प्रेम प्रकरणात , पालक, शिक्षक ओरडल्याने, मार्क कमी पडल्याने आणि इतर कारणाने अल्पवयीन मुले-मुली घर सोडून जाण्याचे प्रकार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्याबरोबर महिलाही हरवण्याचे प्रमाण वाढत आहे. असे असूनही जिल्हा पोलीस दलाकडून हरवलेली मुले, मुली महिला यांचा नियोजनबद्ध तपास करून काही तासातच पालकांकडे स्वाधीन करण्यात पोलिसांनी यश मिळत आहे. त्यामुळे जिल्हा पोलिसा दलाच्या कामाबाबत कौतुक केले जात आहे. मात्र, मुले महिला हरवण्याचे प्रमाण वाढने धोक्याची घंटा ठरत आहे.
हल्लीच्या आधुनिक काळात वाढत असलेले मोबाईल प्रेम, जगाशी जवळ आलेला संपर्क, सोशल साईट्स यामुळे तरुणाईचा ओढा या आधुनिकतेकडे वळत चालले आहे. त्याचबरोबर तरुणाई ही एकल कोंडी झालेली आहेत. शहराचे वाढते आकर्षण, घरातील वातावरण यामुळे तरुणाई ही काही प्रमाणात भरकटत चालली आहे. दुसरीकडे मुलाकडे होणारे पालकांचे दुर्लक्ष, छोट्या छोट्या गोष्टीवर पाल्यावर डाफरणे यामुळे अल्पवयीन मुले मुली हे घर सोडून जाण्यास तयार होतात.
अभ्यासात कमी पडणे, मित्र मैत्रिणी चेष्टा मस्करी करणे, प्रेमात पडणे यामुळे मुले, मुली ही घर सोडून पळून जाण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. हीच बाब महिला बाबतही घडत असते. घरातील मंडळी योग्य वागणूक देत नाहीत, पतीपत्नीत आलेले अंतर, प्रेम प्रकरण यामुळे महिलाही घर सोडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.जिल्ह्यात 2018 साली 92 तर 2019 साली 127 अल्पवयीन मुले मुली घर सोडून गेले होते. 2018 साली 27 मुले तर 74 मुली घर सोडून गेल्या होत्या. यापैकी 90 मुले मुली सापडून आले असून दोन जण अद्याप सापडल्या नाहीत. 2019 साली 46 मुले तर 110 मुली घर सोडून गेल्या होत्या. 127 पैकी 43 मुले व 90 मुलीचा शोध पोलिसांनी लावला आहे. 7 मुले मुली अजून मिळालेली नाहीत. मुलांपेक्षा मुलीचे घर सोडून जाण्याचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे.
जिल्ह्यात 2018 साली 18 वर्षावरील 313 महिला घर सोडून गेल्या असून 291 महिलांचा शोध पोलिसांनी लावला आहे. तर 22 महिलाचा अद्याप शोध लागलेला नाही. 2019 साली 310 महिला घर सोडून गेल्या असून 270 महिलांचा शोध लागला आहे तर यातील तीन महिला मयत आहेत. 40 महिलांचा शोध अद्याप लागलेला नाही. जिल्हा पोलीस दलाकडून घर सोडून गेलेल्या अल्पवयीन मुले, मुली तसेच महिलांचा शोध लावण्यासाठी मुस्कान पथक, बडी कॉप, दामिनी पथक, स्थानिक पोलीस यांच्यामार्फत पथक नेमून कारवाई केली जाते. हरविलेल्या व्यक्तीचा शोध लावण्यासाठी पोलीस हे नियोजन बद्ध काम करीत असल्याने त्यांचा शोध लवकरात लवकर लागला जात आहे. जिल्ह्यातील तसेच परराज्यातुन हरवलेल्या व्यक्तींचाही शोध घेऊन त्यांना त्याच्या पालकांकडे सुपूर्द केले जात आहे. हरविलेल्या अल्पवयीन मुले मुली, महिला यांचा शोध काही तासात लावण्याचा कसबही जिल्हा पोलिस लावत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या या तत्परतेमुळे नागरिकांकडून कौतुक होत आहे.