रायगड - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात वाढत आहे. तसेच लॉकडाऊनमुळे देशाची आर्थिक परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे. असे असतानाही अनेक नागरिक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सढळ हाताने शासनाला मदत करत आहेत. रायगड जिल्हा धान्य दुकानदार संघटनेने सामाजिक बांधिलकी जपत एक महिन्याचे एक कोटींचे कमिशन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून देण्याचे जाहीर केले आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची भेट घेऊन हे जाहीर केले.
हेही वाचा... महाराष्ट्र पोलिसांनाही 50 लाखांचे विमा कवच द्या, गृहमंत्री अनिल देशमुखांची मागणी
रायगड जिल्ह्यात 1,369 रास्त भाव धान्य दुकाने आहेत. या दुकानदारांना महिन्याला क्विंटल मागे 150 रुपये 'पॉस रिबेट' (कमिशन) मिळत असते. रास्त भाव धान्य दुकानदारांना शासनाकडून 8 हजार मेट्रिक टन इतका धान्य साठा नागरिकांना वितरित करण्यासाठी दिला जातो. जिल्ह्यातील 13,689 रास्त भाव धान्य दुकानदारांना महिन्याला एक कोटीहुन जास्त पॉस रिबेट (कमिशन) मिळत असते.
दुकानदारांना मिळणारे हे कमिशन कोरोनाग्रस्तांसाठी देण्याचे संघटनेतर्फे ठरवले आहे, असे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी याबाबत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची भेट घेऊन दुकानदारांना मिळणारे एक कोटीहुन अधिक कमिशन गोळा करून ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे जाहीर केले आहे.
यावेळी रायगड जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, संघटनेचे कार्याध्यक्ष शेखरशेट देशमुख, अलिबाग तालुका दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष महेंन्द्र पाटील, श्री आवास उपस्थित होते. रायगड जिल्हा रेशन दुकानदार संघटनेने घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून करोनाग्रस्तांच्या मदतीच्या कार्याला वेग येण्यास नक्कीच मदत होईल असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी यावेळी सांगितले.