रायगड - महाड इमारत दुर्घटनेला जबाबदार असलेल्या पाच आरोपींपैकी आरसीसी सल्लागार बाहुबली धमाणे याला महाड पोलिसांनी नवी मुंबई येथून अटक केली होती. आज धमाणे याला माणगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसाची (30 ऑगस्ट पर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे. या दुर्घटनेतील मुख्य आरोपी बांधकाम व्यवसायिक फारूक काझीसह तीन जण अद्याप फरार आहेत.
महाड शहरातील काजळपुरा परिसरातील तारिक गार्डन ही इमारत 24 ऑगस्ट रोजी कोसळली. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहेत. तर 2 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आहे आहे. या प्रकरणात महाड पोलीस ठाण्यात पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम व्यवसायिक फारूक काझी, आरसीसी सल्लागार बाहुबली धमाणे, वास्तुविशारद गौरव शहा, तत्कालीन महाड नगरपालिका मुख्याधिकारी दिपक जिंदाड, अभियंता शशिकांत दिघे यांच्यावर गुन्हा दाखल आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 ऑगस्ट रोजी महाड पोलिसांनी नवी मुंबई येथून बाहुबली धमाणे याला ताब्यात घेतले होते. आज माणगाव न्यायालयात धमाणे याला हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इतर चार जणांनाही लवकरच ताब्यात घेतले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा - महाड इमारत दुर्घटना: पोलिसांकडून फरार फारूक काझीच्या मुलाची चौकशी
हेही वाचा - 'मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेला संसार शोधायला सुरूवात'