रायगड- ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्या सरकारने त्वरित मान्य करण्याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाजबांधवांनी आंदोलन केले. तसेच ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींनी निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. आंदोलनकर्त्यानी यावेळी घोषणाबाजी करून सरकारच्या विरोधात निदर्शने केली.
ओबीसी समाज हा राज्यात पन्नास टक्के असून त्या प्रमाणात आरक्षण कमी दिले आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने त्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नका, ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा, ओबीसीचा शासकीय सेवेतील अनुशेष भरा, मेगा भरती त्वरित करा, 100 टक्के शिष्यवृत्ती द्या, आदिवासी जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण पूर्ववत करा, महाज्योती संस्थेसाठी एक हजार कोटीचे पॅकेज द्या, आर्थिक विकास महामंडळाला भरीव निधी द्या, शासकीय सेवेतील ओबीसींना पदोन्नती द्या, अशा विविध मागण्यांसाठी ओबीसी समाज बांधवांनी आज आंदोलन केले.
यावेळी जे डी तांडेल, अनिल पाटील तसेच इतर मान्यवरांनी उपस्थितांसमोर आपले विचार मांडले. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.