रायगड- जुनी पेन्शन योजना आणि इतर विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या शिक्षकांनी आज जिल्हा परिषदेसमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षकांनी जुनी पेन्शन योजना लागू करा, अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
रायगड जिल्हा परिषदेसमोर जिल्ह्यातील शिक्षकांनी आज एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. यावेळी शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे, जिल्हाध्यक्ष संजय निजापकर, जिल्हा कार्याध्यक्ष उदय गायकवाड, जिल्हा कार्यवाह विजय पवार, वैभव पिंगळे आणि जिल्ह्यातील शिक्षक आंदोलनात सहभागी झाले होते. शासनाने कॅशलेस मागणी मान्य केल्याबद्दल शिक्षक संघटनेतर्फे आभार व्यक्त करण्यात आले. जुनी पेन्शन योजना लागू करणे, डीसीपीसी धारकांना सातव्या वेतनाची थकीत रक्कम अदा करणे, मृत धारकांच्या कुटुंबाना १० लाख मदत जाहीर करणे, प्रलंबित निवड श्रेणीचे व वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रस्ताव निकाली काढणे, निवड श्रेणीसाठी एकच निकष करणे, रिक्त पदे त्वरित भरणे, शिक्षकांना मेडिक्लेम योजना लागू करणे, बिंदुनामावली तातडीने पूर्ण करणे, १५ वित्त आयोगाच्या निधीतून जिल्हा परिषद शाळांना आर्थिक मदत आणि वीज बिल देयके देणे, बीएलओ काम रद्द करणे, अशा मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांना दिले. शासनाने प्रलंबित मागण्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी यानिमित्ताने राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी केली.
हेही वाचा- पनवेलमध्ये मुस्लिम समाजाचा नागरिकत्व कायद्याविरोधात मोर्चा